सरकारी यंत्रणा हे एक अजब रसायन आहे. अनुपम खेर यांचा ‘लाईफ में कुछ भी हो सकता है’ असा एक शो होता. प्रत्यक्ष जीवनात सर्वसामान्यांना ‘सरकार में कुछ भी हो सकता है’ या शोची प्रचिती येत असते. प्रशासनाचा असाच एक अजब गजब प्रकार मुख्यमंत्र्यांसाठी आता डोकेदुखी ठरत आहे.
एक वृद्ध तीन वर्षांपासून बेपत्ता आहे. कुटुंबियांनी पोलिसांत तक्रार दिली नाही. कारण घरातून निघून जाणे आणि नंतर महिना-महिना घरी न येणे ही त्यांची सवय होती. पण आता तर तीन वर्षे झाली होती. आता थेट सरकारी जाहिरातीतच त्यांचा फोटो झळकला. हसावे की रडावे अशी कुटुंबियांची अवस्था आहे. पण त्यांच्या सुनेने आनंद झाल्याची प्रतिक्रिया दिली, हे विशेष. त्याचे संपूर्ण श्रेय सरकारी यंत्रणेला जात आहे, हे त्याहून मोठे विशेष.
गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ज्येष्ठ नागरिकांना राज्यातील धार्मिक स्थळाचे दर्शन घडविण्याची योजना मुख्यमंत्र्यांनी घोषित केली. या योजनेची जाहिरात आता चांगलीच चर्चेत आली आहे. कारण या जाहिरातीवर जे वृद्ध नागिरक दाखवले गेले आहेत, ते गेल्या तीन वर्षांपासून बेपत्ता असल्याची बाब समोर आली आहे. घरातून बेपत्ता असलेली व्यक्ती थेट जाहिरातीत दिसल्यामुळे कुटुंबालाही धक्का बसला. काम न करताच खोटे फोटो वापरून प्रचार प्रसार करण्याचा सपाटा सरकारने लावल्याची टीका विरोधकांनी केली आहे.
शिरूर तालुक्यातील वरुडे या गावातील ज्ञानेश्र्वर विष्णू तांबे (वय 68) गेल्या तीन वर्षांपासून बेपत्ता आहेत. याबाबत त्यांच्या सून सुरेखा तांबे यांनी माध्यमांना सांगितले. सासरे महिना-महिना घरी येत नसत. पण गेल्या तीन वर्षांपासून ते घरी आलेच नाहीत. आम्ही पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली नाही. पण आता शासनाच्या जाहिरातीवर फोटो पाहून आनंद झाला, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
एकदा पेपरमध्ये फोटो दिसला
ज्ञानेश्वर तांबे 14 जानेवारी 2021 पासून बेपत्ता आहे. कोरोनामध्येही एकदा आळंदीत ब्लँकेट वाटताना त्यांचा पेपरमधे फोटो आला होता. तेव्हा असे वाटले की तांबे हयात आहेत. मात्र त्यांचा त्यावेळी शोध लागला नाही. आता पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या जाहिरातीवर तांबे यांचा फोटो बघितला. गावातील प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद आहे. कारण आता आमच्या गावातील ज्ञानेश्वर तांबे हयात आहेत, याची खात्री पटली, अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिली.
वडेट्टीवारांची सरकारवर जोरदार टीका
ज्येष्ठ नागरिकांना देवदर्शन घडवणारी योजना सरकारने आणली. मुख्यमंत्री वाजत गाजत योजनेची जाहिराती करतात. काम केलं असेल तर खुशाल जाहिरात करावी. परंतु, खोटं बोलताना थोडं भान ठेवायला हवं. देवदर्शन योजनेच्या जाहिरातीत मुख्यमंत्र्यांनी तीन वर्षांपूर्वी हरवलेले ज्येष्ठ नागरिक तांबे यांचा फोटो वापरल्याची ही बातमी अनेक प्रश्न निर्माण करत आहे. या जाहिरातीमुळे तांबे कुटुंबीयांना किती मनस्ताप होत असेल? सरकारच्या जाहिरातीसाठी जनतेचा पैसा असाच वाया जातोय? हा मोठा गुन्हा असल्याचं विजय वडेट्टीवार म्हणाले.
इंटरनेटवरून घेतला का फोटो?
इंटरनेट आणि सोशल मीडिया वरून व्यक्तीचे फोटो डाऊनलोड करणे आणि परवानगी शिवाय जाहिरातीत वापरणे ही गंभीर बाब आहे. महायुतीच्या योजना जश्या पोकळ आहेत, तश्याच जाहिराती सुद्धा पोकळ आहेत. काम न करताच खोटे फोटो वापरून प्रचार प्रसार करण्याचे ‘गुजरात मॉडेल’ मुख्यमंत्र्यांनी सोडावे, असंही वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.