Administration Efforts : विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. निवडणूक आयोगाची सर्व यंत्रणा जोमाने कामाला लागली आहे. विधानसभा मतदारसंघाची निवडणूक नियोजित पद्धतीने पार पडावी, यासाठी कर्मचाऱ्यांना दोन दिवस प्रशिक्षण देण्यात आले. नागपूर जिल्ह्यासाठी महत्त्वाच्या प्रशिक्षणाला अनेकांनी दांडी मारली होती. ऑक्टोबरमध्ये झालेल्या पहिल्या दिवसाच्या प्रशिक्षणात 1 हजार 759 आणि दुसऱ्या दिवशी 2 हजार 675 कर्मचारी आलेच नव्हते. शहर आणि ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील कर्मचाऱ्यांसाठी हे प्रशिक्ष्ज्ञण होते. आता मतदान काही तासांवर आल्यानंतर यासाठी नेमण्यात आलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची रंगीत तालीम घेण्यात आली.
विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांच्या हाती प्रचारासाठी आता केवळ काहीच तास उरले आहेत. सोमवार, 18 नोव्हेंबरला सायंकाळी प्रचार बंद झाला आहे. त्यानंतर सभा, रॅली किंवा ‘होम टू होम’ प्रचार करता येणार नाही. प्रचार करताना कुणी आढळल्यास संबंधितावर गुन्हा दाखल करण्याची सूचना निवडणूक प्रशासनाने दिली आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी पत्रकार परिषदमध्ये ही माहिती दिली. 4 हजार 631 मतदान केंद्रावर टीम पोहोचणार. अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्याची माहिती इटनकर यांनी दिली.
कारणे दाखवा नोटीस
प्रशिक्षणाला पहिल्या दिवशी 11 हजार 912 कर्मचारी उपस्थित होते. दुसऱ्या दिवशी 10 हजार 142 कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. मतदान केंद्रांवर मतदान करून घेण्याची प्रक्रिया अधिकाऱ्यांना सांगण्यात आली. ईव्हीएम कसे हाताळायचे हे सांगण्यात आले. मतदान अधिकाऱ्यांची जबाबदारी पुन्हा सांगण्यात आली. बोगस मतदार मतदान करण्यासाठी आले तर काय करायचे हे नमूद करण्यात आले. मतदान सुरू असताना अचानक ईव्हीएम बंद पडले तर काय करायचे हे शिकविण्यात आले.
मतदानाची वेळ संपल्यानंतर अखेरच्या मतदाराचे मतदान पूर्ण होईल कशी खबरदारी घ्यायची हे सांगण्यात आले. वेगवेगळ्या नमुन्यांमधील अर्ज तपासण्याची तालीम घेण्यात आली. मॉक पोल कसे घ्यायचे याचे अंतिम प्रशिक्षण यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आले. कर्मचाऱ्यांकडून यावेळी प्रात्यक्षिकही करून घेण्यात आले. प्रशिक्षणालाच अनुपस्थित राहणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना आता निवडणूक आयोगाकडून कारणे दाखवा नोटीस पाठविण्यात आल्या आहेत.
प्रचार थांबवा अन्यथा..
20 नोव्हेंबर रोजी 288 सदस्यीय महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक एकाच टप्प्यात होणार आहे. याची घोषणा निवडणूक आयोगाने केली होती. 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ 26 नोव्हेंबरला संपत आहे. त्याअनुषंगाने होणाऱ्या निवडणुकीसाठी अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षणानंतर टीम सज्ज झाल्या आहेत. 4 हजार 631 मतदान केंद्रावर टीम पोहोचणार आहेत. दिव्यांगांचे ‘होम व्होटिंग’ झाले आहे. मदतानाच्या दिवशी अनेक ठिकाणी ड्रोनची नजर राहणार आहे. जिल्हाधिकरी विपीन इटनकर यांनी तृतीयपंथीय, युवा, महिला वर्गाला जास्तीत जास्त मतदान करण्याचे आवाहन केले आहे. मुदन संपल्यानंतर प्रचार न करण्याचे आवाहन केले. अन्यथा कारवाईचा इशाराही दिला.