Congress Vs BJP : मध्य नागपूर मतदारसंघ यंदा संपूर्ण राज्यात गाजला. उमेदवारी जाहीर होण्यापासून सुरू झालेला खेळ अजूनही सुरू आहे. मतदानाला अवघे दहा-अकरा दिवस शिल्लक असताना मध्य नागपुरात रोज नवनवीन घडामोडी होत आहेत. वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी आता एक नवा डाव खेळल्यामुळे काँग्रेसचे बंटी शेळके टेंशनमध्ये आले आहेत. काँग्रेसकडे जाणाऱ्या मतांचे विभाजन करणारा हा डाव भाजपचे प्रवीण दटके यांच्यासाठी फायद्याचा ठरू शकतो, अशी चर्चा आहे.
बंटी शेळकेच होणार काय?
मध्य नागपुरात काँग्रेसने सुरुवातीलाच सर्व दावे मोडीत काढून बंटी शेळके यांच्यावर विश्वास टाकला. 2019मध्ये भाजपचे विकास कुंभारे यांच्याविरोधात लढताना त्यांना अवघी चार हजार मतं कमी पडली होती. त्यावेळी कुंभारे यांच्याबद्दलचा भाजप परिवारामध्ये असलेला रोष कारणीभूत होता, असे बोलले जाते. मात्र, यंदा भाजपने हलबा समीकरण बाजुला ठेवून प्रवीण दटके यांना उमेदवारी दिली. यंदा रमेश पुणेकर यांच्यामुळे भाजपची हलबा मतं कमी होतील, पण काँग्रेसला अपवादानेच या समाजाची मतं मिळणार आहेत. भाजपसोबत काही हलबा समाजाच्या संघटना आहेत आणि त्यांनी पाठिंबाही जाहीर केला आहे. मात्र, काँग्रेसला यंदा जवळपास सर्वच हलबा मतांना मुकावे लागणार आहे.
दुसरीकडे, अनिस अहमद यांनी भाजपचे गणीत बिघडवले होते. अनिस यांनी काँग्रेसने तिकीट नाकारले म्हणून वंचितमध्ये प्रवेश केला होता. पण उमेदवारी अर्ज दाखल करायला ते वेळेवर पोहोचले नाहीत. हा भाजपसाठी मोठा धक्का होता. मुस्लीम मते अनिस अहमद यांच्याकडे वळली असती तर काँग्रेसचे मतदार आपोआप कमी झाले असते. पण अनिस यांनी पलटी मारल्यामुळे भाजपचे गणीत बिघडले. दरम्यान, या संपूर्ण प्रकारामुळे प्रकाश आंबेडकर संतापले होते. आता काँग्रेस आणि अनिस अहमद यांना धडा शिकवण्यासाठी त्यांनी मध्य नागपुरातील मुस्लिम उमेदवाराला वंचितचा अधिकृत पाठिंबा जाहीर केला आहे. हाजी मोहम्मद कलाम हे मध्य नागपुरातील अपक्ष उमेदवार आहेत. त्यामुळे काँग्रेसचे बंटी शेळके यांच्यापुढे दुहेरी टेंशन निर्माण झाले आहे.
एमआयएम वंचितसोबत?
Nagpur : मध्य नागपुरात एमआयएमने उमेदवार दिला नाही, त्यामुळे ही मते काँग्रेसला जाणार हे निश्चित होते. पण आता वंचित बहुजन आघाडीसोबत एमआयएम देखील हाजी मोहम्मद कलाम यांना अधिकृत पाठिंबा जाहीर करण्याच्या तयारीत आहे. तसे झाल्यास मुस्लिम व दलित मते मोठ्या प्रमाणात कलाम यांना जातील. हे बंटी शेळके यांच्यासाठी जास्त घातक आहे. त्यामुळे शेळकेंपुढे आता ऐन मतदानाच्या दहा दिवस आधी दुहेरी टेंशन उभे झाले आहे.