अजित पवार हे काका शरद पवार यांच्यापासून वेगळे झाल्यानंतर उपराजधानी नागपूरातही राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन तुकडे पडले. युवा नेते प्रशांत पवार अजित दादांसोबत गेले. तर तत्कालिन एकसंघ असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नागपूर शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे हे शरद पवारांसोबत राहिले. तेव्हा अजित पवार गटाचे कार्यालय प्रशांत पवार यांच्या बजाज नगर परिसरातील ऑफीसमध्ये थाटले गेले. हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला (15 डिसेंबर) पक्षाचे अधिकृत कार्यालय गणेशपेठ येथे सुरू करण्यात आले आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, कार्यकारी राष्टीय अध्यक्ष खासदार प्रफुल पटेल ,प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते विदर्भ,नागपूर शहर ,ग्रामीण पक्ष कार्यालयाचा उद्घाटन समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला.नागपूर येथील गणेशपेठ परिसरात या अत्याधुनिक आणि सुसज्ज कार्यालयातून जनसेवेची तसेच पक्षाच्या संघटन वृद्धीसाठीची सर्व महत्त्वपूर्ण कामे होतील, अशी अपेक्षा मान्यवरांनी व्यक्त केली.
स्वप्ने साकार करण्यासाठीही..
याप्रसंगी पक्षाचे ज्येष्ठ नेते, खासदार, नवनिर्वाचित आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. “हे कार्यालय पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने ‘हे माझे कार्यालय आहे’, असे समजावे. हे कार्यालय भविष्यात पक्षाच्या विदर्भातील संघटन बळकटीसाठी तर आहेच. पण ते कार्यकर्त्यांच्या आशा आणि स्वप्ने साकार करण्यासाठीही आहे, असे खासदार प्रफुल पटेल कार्यालयाच्या उद्घाटनावेळी म्हणाले. कार्यालयाचे काम वेळेत पूर्ण करून कामकाज सुरू केल्याबद्दल अजित पवारांनी नागपूर जिल्ह्याचे निरीक्षक माजी आमदार राजेंद्र जैन यांचे कौतुक केले.
दोन ब्लॉकमध्ये असलेले हे कार्यालय एक आधुनिक सुसज्य इमारत आहे. ज्यामध्ये पदाधिकाऱ्यांना सोयीची जागा आणि भव्य हॉल आहे. शहरातील बस स्थानक , रेल्वे स्टेशन आणि विमानतळापासून जवळ असलेले पदाधिकाऱ्यांच्या सोयीचे हे कार्यालय आहे.
Sudhir Mungantiwar : मंत्रिमंडळाच्या यादीत कोणत्या पेनने नाव लिहिले होते, कळलं नाही!
उद्घाटनाच्या वेळी नुकतेच पक्षात घर वापसी झालेले दिलीप पनकुले , बजरंगसिंग परिहार , जानबा मस्के, रमण ठवकर तसेच पक्षात नुकतेच प्रवेश घेणारे काँग्रेसचे नेते तानाजी वनवे यांना राष्ट्रवादीचे दुपट्टे घालून स्वागत करण्यात आले. उदघाटन सोहळ्याप्रसंगी धनंजय मुंडे , राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर , शहराध्यक्ष प्रशांत पवार, ग्रामीण अध्यक्ष बाबा गुजर, कार्याध्यक्ष श्रीकांत शिवणकर, प्रदेशचे अनिल अहिरकर, सोहेल पटेल, आनंद सिंग, महिला अध्यक्ष सुनीता येरणे, युवक अध्यक्ष विशाल खांडेकर, विद्यार्थी विदर्भ अध्यक्ष माधुरी पालीवाल, अरविंद भाजीपाले, अभिदत्त फाले, मेहबूब पठाण, निस्सार अली मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.