Wani – Chandrapur Co-operative Sector : विहित पुराव्याच्या आधारावर सातत्याने तक्रारी करण्यात येत असल्याने वणीतील रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्था वादाच्या घेऱ्यात सापडली आहे. विधानसभेतील विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांच्या पत्रावरून सहकार आयुक्त आणि निबंधक, सहकारी संस्था पुणे यांनी 30 जानेवारी 2024 रोजी रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेचे चाचणी लेखापरिक्षण करण्याबाबत आदेश निर्गमित केले होते. त्यानंतर अमरावतीचे चौकशी पथक संस्थेत दाखल झाले आहे.
चौकशी पथक दाखल
चौकशी पथक आल्यानंतर संस्थेच्या संचालक मंडळात आणि प्रशासनात चांगलीच खळबळ उडाली आहे. कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी लगीनघाई सुरू झाली आहे. श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेचे कार्यक्षेत्र महाराष्ट्रभर आहे. यवतमाळ जिल्हा तसेच चंद्रपूर जिल्ह्यात संस्थेच्या मोठ्या प्रमाणात शाखा आहेत. संस्थेची वार्षिक उलाढाल कोट्यवधींच्या घरात आहे. मात्र संस्थेविरोधात मागील वर्षभरापासून पुराव्याच्या आधारावर तक्रारींचे सत्र सुरू आहे.
संगनमताने कोट्यवधीचा भ्रष्टाचार आणि आर्थिक घोटाळ्याच्या आरोपाने संस्थेची प्रतिमा डागाळली आहे. तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी, संचालक मंडळ तसेच सद्यस्थितीत कार्यरत असलेल्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची कार्यप्रणाली संशयाच्या घेऱ्यात सापडली आहे. रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेचा चौकशी व छाननी अहवाल 30 जानेवारी 2023 रोजी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यवतमाळ यांनी सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था पुणे यांचेकडे सादर केला.
या अहवालामध्ये डीडीआर यांनी 70 कोटींच्या बोगस कर्जवाटपात हेराफेरी करून 7 कोटी दर्शविल्याचा आरोप 30 एप्रिल 2024 रोजी अमोल नावडे व प्रसाद खडसान यांनी तक्रारीतून केला आहे. यामुळे संस्थेची अभ्रू वेशीवर टांगल्या गेल्याचे दिसत आहे. तसेच डीडीआर यांना सेवेतून बडतर्फ करून त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याची मागणी लावून धरण्यात आल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थे विरोधात विहित पुराव्याच्या आधारावर 17 आरोप करण्यात आले आहेत.
Maharashtra Lok Sabha Election : शांतिगिरी महाराजांनी ईव्हीएम मशीनला हार घातला
घाटंजी शाखेतील कर्मचारी व संचालक यांनी खातेदारांच्या आरडी व एफडी खात्यावर परस्पर कोट्यवधी रुपयांचे कर्ज उचलल्याचा आरोप केला आहे. याबाबत जिल्हा उपनिबंधकांनी घाटंजी शाखेत अनियमितता असल्याचे स्पष्ट करत संबंधितांवर कारवाई अपेक्षित असल्याचे चौकशी अहवालात म्हटले आहे. मात्र अद्यापर्यंत संस्थेने कारवाईचे करण्याचे सौजन्य दाखविले नसल्याने संचालक मंडळाची कार्यप्रणाली सभासद, ठेवीदारांना संभ्रमात टाकणारी ठरत आहे.
रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये सर्वसामान्य ठेवीदारांच्या कोट्यवधी रुपयांच्या ठेवी धोक्यात आल्या आहेत. संस्थेचे वयक्तिक खाते क्रमांक 15995 या बचत खात्यातील आर्थिक व्यवहार संशयाच्या घेऱ्यात आहेत. संस्थेचे चाचणी लेखपरिक्षण करण्यासाठी सहकार आयुक्त आणि निबंधक, सहकारी संस्था पुणे यांनी अमरावती येथील जगदीश आर गवळे जिल्हा विशेष लेखपरिक्षक यांची नियुक्ती केली आहे. त्यांच्या समवेत पथकाने चौकशी आरंभली आहे. लेखा परिक्षण अहवालात आणि चौकशीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. या चौकशीतून काय निष्पन्न होते, हे पाहणे औत्स्युक्याचे ठरणार आहे.