Bhandara : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र फाडून त्यांचा अपमान केला आहे. त्यांच्या विरोधात राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भंडारा भाजपने खासदार सुनील मेंढे यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या आंदोलनातून केली आहे. यावेळी एक निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला पाठविण्यात आले.
महाड येथे मनुस्मृतीच्या विरोधात आंदोलन करताना आमदार जितेंद्र आव्हाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे छायाचित्र फाडून आव्हाडांनी त्यांचा घोर अपमान केला आहे. हे कृत्य अत्यंत घृणास्पद आहे. जितेंद्र आव्हाडांच्या विकृत मानसिकतेचे दर्शन घडविणारे आहे, असे म्हणत भाजप भंडारा जिल्हा, तालुका, शहर यांच्यावतीने आव्हाडांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालय चौकात भाजप कार्यकर्त्यांनी एकत्रित येवून आव्हाडांच्या फोटोला जोडे मारले.यावेळी जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर खा. सुनील मेंढे यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांना निवेदन दिले. आव्हाडांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. यावेळी भाजपचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.