BJP News : विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान उत्तर मध्य मुंबईचे महायुतीचे उमेदवार ॲड. उज्ज्वल निकम यांच्यावर केलेली टीका त्यांना भोवली आहे. निवडणूक आयोगाकडून झालेल्या तक्रारीच्या आधारावर सीताबर्डी पोलिस ठाण्यात वडेट्टीवार यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.
निकम यांच्यावर टीका करताना वडेट्टीवार यांनी काही आरोप केले होते. त्यात मुंबई हल्ल्यातील शहीद पोलिस अधिकारी हेमंत करकरे यांना लागलेली गोळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित पोलिस अधिकाऱ्याच्या पिस्तुलातून लागल्याचे वक्तव्य वडेट्टीवार यांनी केले होते. या वक्तव्याचा भारतीय जनता पक्षाने निषेध केला होता. तसेच वडेट्टीवार यांच्याविरुद्ध भाजपा विधी आघाडी नागपूरतर्फे तक्रार करण्यात आली होती. विधी आघाडी नागपूर महानगरचे अध्यक्ष ॲड. परीक्षित मोहिते यांनी याबाबत सीताबर्डी पोलिसांत ही तक्रार नोंदवली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्याने खळबळ
ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांना भारतीय जनता पक्षाने मुंबईतून उमेदवारी दिली. त्यानंतर विजय वडेट्टीवार यांनी वेगळाच सूर लावला. हे कसले वकील हे देशद्रोही. तसेच शहीद आयपीएस अधिकारी हेमंत करकरे यांच्यावर झाडलेली गोळी रा. स्व. संघाशी संबंधित अधिका-याच्या बंदुकीतील होती. असा खळबळजनक आरोप केला होता. ऐन लोकसभा निवडणुकीत आरोप झाल्याने राजकारण ढवळून निघाले. भारतीय जनता पक्षाच्या विधी आघाडीने मात्र त्यांच्या वक्तव्याला आव्हान दिले आहे.