Political war : कथित ऑडिओ क्लिपमध्ये वंचित आघाडीचे सर्वेसर्वा अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल वादग्रस्त विधान काँग्रेस नेत्याला भोवले. वंचितच्या तक्रारीवरुन माजी नगरसेवक साजीद खान पठाण यांच्यावर अकोल्यातील डाबकी रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
साजीद खान पठाण यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. यामध्ये साजीद खान पठाण हे मौलाना यांना आणि प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह बोलत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
अकोला लोकसभा मतदारसंघात मतदान आटोपले तरी राजकारण चांगलंच तापलं आहे. महाविकास आघाडी आणि वंचितमध्ये आघाडी झाली नसल्याने वंचितकडून उमेदवार उभे करण्यात आले. सर्वत्र निकालाचे वेध लागले असताना काँग्रेसच्या नेत्याच्या आक्षेपार्ह विधान अंगलट आले आहे. व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये साजीद खान पठाण यांनी मौलाना आणि वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप आहे. त्यानंतर वंचित कडून पोलिस अधीक्षकांसह पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली. या प्रकरणी साजीद खान पठाण यांच्यावर विविध कलमानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
डाबकी रोड पोलिसांनी वंचितचे महासचिव गजानन गवई यांनी दिलेल्या तक्रारी वरून भांदविचे कलम 153 अ, 120 ब, 295 अ आणि 504 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
PM Narendra Modi : नकली राष्ट्रवादी, नकली शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन होणार
साजीद खान पठाण यांच्यावर आरोप!
काँग्रेसचे साजीद खान पठाण यांनी मौलवींनी प्रकाश आंबेडकरांना मतदान करण्याचे अपील का केले या कारणावरून मौलवी आणि प्रकाश आंबेडकर यांच्या बद्दल आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप आहे. वंचितने दिलेल्या तक्रारीत तसे म्हटले आहे.
कोण आहेत साजीद खान पठाण!
साजीद खान पठाण हे अकोल्यातील काँग्रेसचे मोठे नेते मानले जातात. ते सन 2007 च्या महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसचे नगरसेवक म्हणून ते निवडून आले होते. त्यानंतर स्थायी समितीचे सभापती, तसेच अकोला महापालिकेत विरोधी पक्षनेता म्हणूनही त्यांनी काम केले आहे. 2019 च्या निवडणुकीत त्यांना अकोला पश्चिम विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून उमेदवारी मिळाली होती. या निवडणुकीत 67 हजार 629 हजार मते साजीद खान यांना मिळाली. तर भाजप उमेदवार शर्मा यांचा अवघ्या 2 हजार 662 मतांनी निसटता विजय झाला होता. दरम्यान आमदार गोवर्धन शर्मा यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या अकोला पश्चिम मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर साजीद खान पठाण यांना काँग्रेसने पुन्हा उमेदवारी दिली होती. मात्र,उच्च न्यायालयाच्या निकालानंतर येथील निवडणूक रद्द झाली.