Lok Sabha Election : ‘मी बीजेपीचा कार्यकर्ता बोलतोय. अनुपजी तुम्ही बीजेपीचे जे पैसे वाटपासाठी दिले होते. ते कार्यकत्यापर्यंत पोहोचले नाही’ .. अशा आशयाचा उल्लेख असलेला व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याप्रकरणी भाजपा शहराध्यक्ष प्रवीण घाईट यांच्या तक्रारीवरुन व्हीडिओ व्हायरल करणाऱ्या युवकाविरुद्ध पोलिसांनी आचारसंहिता भंग करण्यासह विविध गुन्हे दाखल केले आहेत.
बार्शिटाकळी येथील साहिल अग्रवाल नामक व्यक्तीचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला. त्या व्हीडिओमध्ये बार्शिटाकळी येथील पदाधिकाऱ्यांनी लोकसभा निवडणुकीत पक्षाकडून पैसे घेत दुसऱ्या एका पक्षाचे काम केल्याचा आरोप केला होता. त्याचबरोबर पक्षासाठी आलेला निधी कार्यकर्त्यांना वाटप केला नसल्याचा दावा केला होता. या व्हिडिओने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. व्हीडिओमध्ये एक इसम स्वतःचे नाव साहील अग्रवाल रा. बार्शिटाकळी असे सांगत असून ‘मी बिजेपीचा कार्यकर्ता बोलत आहो. अनुपजी तुम्ही बिजेपीचे जे पैसे वाटपासाठी दिले होते. ते कार्यकत्यापर्यंत पोहोचले नाही. ते बिजेपीचे जेष्ठ कुचीन नेत्यांनी हे पैसे खाल्ले असल्याचा आरोप केला आहे.
बार्शिटाकळीत पंजा चालला ..
‘मी तुम्हाला सांगतो, तुम्ही या इलेक्शनमध्ये पडणार आहात. कारण इथे पूर्ण पंजा चालविला आणि बीजेपीचे जे लोक आहेत ‘कुचिन’ .. आहेत. यांनी पैसे खाल्ले आहेत, असे व्हिडिओ क्लिपमध्ये व्यक्ती बोलताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये स्वतःचे नाव साहिल अग्रवाल सांगत असलेला व्यक्ती हा सुनील दयाराम भगत रा. तेलीपुरा, बार्शिटाकळी येथील रहिवासी आहे.
Lok Sabha Election : युवक काँग्रेसला बदनाम करण्याचे कर्तृत्वहिनांचे षडयंत्र
भाजपा शहराध्यक्षाची तक्रार
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू आहे. भाजपाविरुद्ध आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल करून आचारसंहितेचा भंग करणे. भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना शिविगाळ करून पक्षाची व पदाधिकाऱ्यांची बदनामी झाली आहे, अशी तक्रार भाजप शहर अध्यक्ष प्रवीण घाईट यांनी बार्शिटाकळी पोलिसात दिली आहे. यावरून सुनील दयाराम भगत उर्फ साहिल अग्रवाल याच्याविरुद्ध आचारसंहितेचा भंग करण्यासोबत विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
बदनामीकारक व्हिडिओ व्हायरल करण्यासोबत शिविगाळ व अन्य प्रकाराबाबत भाजप शहराध्यक्ष प्रवीण घाईट यांनी तक्रार दिली आहे. स्वतःचे खोटे नाव सांगून या युवकाने व्हिडीओ तयार करीत भाजपची बदनामी केली. अशा तक्रारीवरून बार्शिटाकळी पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे असे ठाणेदार शिरीष खंडारे यांनी सांगितले.