Poster By Akolekar : अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात काँग्रेस विरोधात सुरू असलेली पोस्टरबाजी चर्चेत आली आहे. या पोस्टरबाजीमध्ये राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे नाव पुढे आल्यानं आता अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मात्र राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अनेक पदाधिकारी हे या फलकबाजीबद्दल अनभिज्ञ आहे. फलकांवर राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे नाव वापरण्यात आले आहे. यासंदर्भात आता राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी अकोल्यातून माहिती मागविली आहे.
आश्चर्य..
काँग्रेसविरोधात सुरू असलेल्या फलकबाजीसंदर्भात ‘द लोकहित’ने नागपुरात डॉ. तायवाडे यांच्याशी संपर्क साधला. राष्ट्रीय ओबीसी महासंघाने अचानक अशी भूमिका कशी घेतली, असा प्रश्न डॉ. तायवाडे यांना विचारण्यात आला. अकोल्याती फलकांचे फोटो पाहिल्यानंतर डॉ. तायवाडे यांनाही आश्चर्य वाटले. अशा प्रकारचे फलक लावण्याबाबत कोणतीही सूचना आपण दिलेली नाही. राष्ट्रीय ओबीसी महासंघाने नागपुरातूनही अशी कोणताही सूचना दिलेली नाही, असे डॉ. तायवाडे यावेळी म्हणाले.
अकोल्यात विचारणा
महासंघाने फलक लावण्याबाबत सूचना दिलेली नाही. त्यामुळे अकोल्यातील फलकबाजी कोणी केली, असा प्रश्न डॉ. तायवाडे यांना विचारण्यात आला. त्यावरही डॉ. तायवाडे यांनी उत्तर दिले. राष्ट्रीय ओबीसी महासंघातील प्रत्येक पदाधिकारी अत्यंत जबाबदारीने वागतो. कोणताही पदाधिकारी परस्पर मनमानी पद्धतीने निर्णय घेत नाही. महासंघ हे राजकीय व्यासपीठ नाही. ती ओबीसी महासंघाची संघटना आहे. देशभरातील ओबीसी समाज महासंघाशी जुळलेला आहे. त्यामुळे कोणाशीही चर्चा न करता अशी फलकबाजी केली जाईल असे वाटत नसल्याचे डॉ. तायवाडे म्हणाले.
चर्चा करणार
यासंदर्भात आपण अकोल्यातील राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहोत. हा फलक कोणी लावला याची माहिती महासंघाच्या स्थानिक कार्यकारिणीकडून घेण्यात येईल. ही माहिती आपल्याकडे आल्यानंतरही यासंदर्भात ठामपणे सांगता येईल, असे डॉ. बबनराव तायवाडे म्हणाले. राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या नावाचा गैरवापर करीत ही फलकबाजी करण्यात आली का? यावर डॉ. तायवाडे म्हणाले की जोपर्यंत महासंघाच्या अधिकृत पदाधिकाऱ्यांकडून यासंदर्भात माहिती येत नाही, तोपर्यंत कोणत्याही निष्कर्शावर पोहोचून कोणतीही प्रतिक्रिया देणे संयुक्तीक होणार नाही. त्यामुळे स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतरच याबाबत बोलणार असल्याचे डॉ. बबनराव तायवाडे म्हणाले. त्यामुळे अकोल्यात राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या नावाने लागलेले फलक दिशाभूल करणारे तर नाहीत ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे फलकबाजी करणारा ‘एक अकोलेकर’ शोधण्याचे आव्हान आता सगळ्यांपुढेच आहे.