महाराष्ट्र

Maharashtra Cabinet : देवाभाऊंच्या मंत्रिमंडळात विदर्भ, मराठवाड्याचा डंका 

Oath Ceremony : राज्यातील 42 पैकी 15 मंत्री दोन्ही विभागातील 

Raj Bhavan Nagpur : महायुती सरकारच्या दुसऱ्या टर्मला आता दमदार सुरुवात झाली आहे. 33 वर्षांच्या ऐतिहासिक खंडानंतर उपराजधानी नागपूरमध्ये कॅबिनेट मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला आहे. या शपथविधीमध्ये महायुतीमधील तीनही पक्षांनी धक्का तंत्राचा वापर केला आहे. अनेक ज्येष्ठ नेत्यांना बाजूला करत नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. देवाभाऊ अर्थात देवेंद्र फडणवीस यांच्या या मंत्रिमंडळामध्ये विदर्भ आणि मराठवाड्याचा डंका कायम आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः विदर्भाचे सुपुत्र आहे. विदर्भावर आतापर्यंत झालेल्या अन्यायाच्या बाबतीत भाजपने मोठ्या प्रमाणावर आंदोलनं केली आहेत. यापैकी अनेक आंदोलनांमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा सहभाग घेतला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याबाबतीतही अनेक विक्रम आहेत. कमी वयाचे महापौर होण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. पूर्णवेळ मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रात कार्यकाळ पूर्ण करण्याचा रेकॉर्डही फडणवीस यांच्याच नावावर आहे. सगळ्यात कमी कार्यकाळ असणारे 72 तासांचे मुख्यमंत्री देखील देवेंद्र फडणवीस हेच ठरले आहे.

आणखी एक ‘रेकॉर्ड’

देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे आणखी एक ‘रेकॉर्ड’ झाला आहे. हा रेकॉर्ड आहे 33 वर्षानंतर नागपूरमध्ये मंत्रिमंडळाच्या शपथविधीचा. सलग दोन टर्म तीन पक्षांचे सरकार चालविण्याची नोंदही फडणवीस यांच्या नावाने असेल. महाराष्ट्राला सलग दोनदा उपमुख्यमंत्री देण्याची नोंदही देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नांमुळे झाली आहे. यंदाच्या त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये विदर्भ आणि मराठवाड्याला मोठे प्राधान्य मिळाले आहे. राज्याच्या मंत्रिमंडळात सध्या 42 सदस्य संख्या आहे. मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांसह एकूण 42 मंत्री सध्या राज्यात आहेत.

मंत्रिमंडळामध्ये विदर्भ आणि मराठवाड्यातील मंत्र्यांची संख्या 15 आहे. उर्वरित 27 मंत्री राज्याच्या अन्य भागातील आहेत. विदर्भातील नऊ आमदारांना तर मराठवाड्यातील सहा आमदारांना महायुती सरकारने मंत्री केले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना फडणवीस यांनी मंत्री केले आहे. दिग्रसमधून शिवसेनेचे संजय राठोड यांनाही संधी मिळाली आहे. यवतमाळमधून अशोक उईके आणि इंद्रनील नाईक हे देखील मंत्री झाले आहेत.

Pankaja Munde : ठोकर लागल्यानंतर आता मर्यादित बोलण्यावर भर 

खामगावमधून आकाश फुंडकर आणि वर्धा मधून पंकज भोयर यांनाही मंत्रिमंडळात घेण्यात आली आहे. रामटेक मधील आशिष जयस्वाल यांना मंत्रिमंडळात घेतल्याने विदर्भातील मंत्र्यांची संख्या बऱ्यापैकी वाढली आहे. त्यामुळे फडणवीस हे पुन्हा एकदा विदर्भ आणि मराठवाड्याच्या विकासावर भर देतील, असे सांगण्यात येत आहे. फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील शपथविधीला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे देखील उपस्थित होते. नागपुरात आल्यानंतर फडणवीस यांनी नितीन गडकरी यांचे आशीर्वाद घेतले. दिल्लीमध्येही ते गडकरी यांना आवर्जून भेटले. त्यामुळे नागपूर आणि विदर्भाच्या विकासासाठी पुन्हा एकदा फडणवीस-गडकरी यांच्या ‘कॉम्बो पॅक’ दिसेल यात संशयच नाही.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!