विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बुलढाणा जिल्ह्यातील प्रत्येक मतदार संघात मतदारांच्या संख्येत वाढ झाली आहे. हजारो मतदारांनी नाव नोंदणी केली आहे. त्यात सर्वाधिक मतदार नोंदणी ही महिलांची झाली आहे. जवळपास २५ हजाराच्यावर नवीन महिला मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. त्या खालोखाल पुरूष नवमतदारांनी ही मतदान यादीत नोंदणी केली आहे. एकंदरीत 42 हजार 785 नवमतदारांची भर पडली आहे.
महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात होऊ शकते. यासाठी निवडणूक आयोगाने नव मतदारांच्या नाव नोंदणीची मोहीम सुरू केली होती. याला चांगला प्रतिसाद मिळाला. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 1 जुलै 2024 या अर्हता दिनांकावर आधारित मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या मतदारयादीची मतदारांनी पडताळणी करावी. यादीमध्ये नाव नसल्यास तातडीने मतदार नोंदणी करावी, असे आवाहन बुलढाणा जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.
अंतिम यादी प्रसिद्ध होणार..
मतदारयादीचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित करण्यात आला. त्यानुसार दि. 6 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली. त्यानंतर दि. 6 ते 20 ऑगस्ट दरम्यान सर्व विधानसभा मतदारसंघ व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांनी प्राप्त दावे व हरकती निकालात काढले. त्यानंतर दि. 30 ऑगस्ट 2024 रोजी अंतिम मतदार यादी सर्व मतदान केंद्र, तहसिलदार तथा सहायक मतदार नोंदणी अधिकारी कार्यालय, उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी कार्यालय व जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
दि. 6 ऑगस्ट रोजीच्या प्रारूप मतदारयादीमध्ये 20 लाख 74 हजार 292 मतदार होते. यात 35 हजार 54 नवमतदारांची नोंद झाली आहे. 4 हजार 821 मतदारांची नावे वगळण्यात आली असून मतदारयादीमध्ये 30 हजार 233 मतदारांची वाढ झाली आहे. वाढ झालेल्या मतदारांमध्ये 12 हजार 164 पुरूष, 18 हजार 67 स्त्री आणि 2 तृतीयपंथी मतदार आहेत. यानुसार दि. 30 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झालेल्या अंतिम मतदारयादीमध्ये 21 लाख 4 हजार 525 मतदार झाले आहेत.
अशी आहे मतदारांची वाढ
मलकापूर मतदारसंघात 1 लाख 48 हजार 562 पुरुष, 1 लाख 36 हजार 131 महिला, तर तृतीयपंथी 6 असे 2 लाख 84 हजार 699 मतदार आहे. बुलढाणा मतदारसंघात 1 लाख 56 हजार 957 पुरुष, 1 लाख 44 हजार 740 महिला, तर तृतीयपंथी 15 असे 3 लाख 1 हजार 712 मतदार आहेत.
चिखली मतदारसंघात 1 लाख 54 हजार 575 पुरुष, 1 लाख 45 हजार 300 असे 2 लाख 99 हजार 875 मतदार आहेत. सिंदखेडराजा मतदारसंघात 1 लाख 66 हजार 928 पुरुष, 1 लाख 52 हजार 331 महिला, तृतीयपंथी 1 असे 3 लाख 19 हजार 260 मतदार आहेत. मेहकर मतदारसंघात 1 लाख 58 हजार 135 पुरुष, 1 लाख 44 हजार 681 महिला, तृतीयपंथी 4 असे 3 लाख 2 हजार 820 मतदार आहेत.
खामगाव मतदारसंघात 1 लाख 54 हजार 568 पुरुष, 1 लाख 40 हजार 452 महिला, तृतीयपंथी 5 असे 2 लाख 95 हजार 25 मतदार आहेत. जळगाव जामोद मतदारसंघात 1 लाख 57 हजार 374 पुरुष, 1 लाख 43 हजार 756 महिला, तृतीयपंथी 4 असे 3 लाख 1 हजार 134 मतदार आहेत. जिल्ह्यात एकूण 10 लाख 97 हजार 99 पुरुष, 10 लाख 7 हजार 391 महिला, तसेच तृतीयपंथी 35, असे 21 लाख 4 हजार 525 मतदार झाले आहे.
अंतिम मतदारयादीमध्ये 18-19 वयोगटातील नवमतदारात 27 हजार 170 पुरूष, 15 हजार 613 महिला, तृतीयपंथी 2 असे एकूण 42 हजार 785 मतदार आहेत. प्रारूप मतदारयादीच्या तुलनेत 8 हजार 204 मतदारांची वाढ झाली आहे. 2024च्या अंदाजित लोकसंख्येच्या तुलनेत मतदारयादीतील मतदारांची टक्केवारी 71.89 आहे. महिलांचे प्रमाण 912 वरून 918 झाले आहे. अंतिम मतदारयादीमध्ये 15 अनिवासी भारतीय मतदार, तर 17 हजार 480 दिव्यांग मतदार आहेत.
थेट सामना रंगणार
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी विरूद्ध महायुती असा थेट सामना रंगणार आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने महायुतीला धोबी पछाड दिली होती. विधानसभेत त्याची पुनर्रावृत्ती करण्यासाठी महाविकास आघाडी उत्सुक आहे. त्यामुळे महायुतीत विरोधाचं रान उठवलं जात आहे. तर लाडकी बहिण योजनेच्या जोरावर निवडणूक जिंकण्याचा मानस महायुतीने केला आहे.