Police Recruitment Process : पावसाळ्यात पोलीस भरती प्रक्रिया घेण्यात येऊ नये यासाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन उभे केले होते. प्रचंड विरोध करूनही पोलीस भरती प्रक्रिया सुरु झाली. पण ज्या विद्यार्थ्यांचे सरकारने ऐकलं नाही त्या विद्यार्थ्यांसाठी निसर्ग धावून आला. पावसात मैदानी चाचण्यांना अडचण निर्माण होत असल्याचे सांगत अनेक भागात पोलीस भरती प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे. आज 8 जुलै रोजी होणाऱ्या अनेक जिल्ह्यातील पोलीस भरतीच्या मैदानी चाचण्या पावसामुळे रद्द करण्यात आल्या आहेत.
राज्यात पोलीस भरतीची प्रक्रिया सुरु आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये मैदानी चाचणी घेण्यात येत आहे. या चाचणीसाठी उमेदवार देखील दूरवरून आलेत. परंतू अनेक ठिकाणी पावसामुळे मैदान ओले आहे. त्याचा फटका उमेदवारांना बसतो आहे. काही ठिकाणी मैदानी चाचणी रद्द करण्यात आली आहे. तर काही ठिकाणी मैदानी चाचणी पुढे ढकलण्याची मागणी उमेदवारांनी केली आहे. अकोल्यात मैदानी चाचणी रद्द करुन ती आता 11 जुलै रोजी घेण्यात येणार आहे. परंतु पावसाळ्यात मैदानी चाचणी घेण्याच्या पोलीस प्रशासनाच्या निर्णयावर टीका होत आहे.
आधीपासूनच भरती विरोधात विद्यार्थी
राज्यातील विविध जिल्ह्यात 17 हजार 441 पदांसाठी पोलीस भरती प्रक्रिया सुरू आहे. ऐन पावसाळ्यात पोलीस भरती प्रक्रिया राबविण्यात येत असल्यामुळे भरतीला आधीपासूनच मोठा विरोध होता. पावसाळ्यात मैदानी चाचणी घेणे कठीण असते. कारण मैदान ओले असताना मैदानी चाचणी शक्य नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांनी या भरतीविरोधात आंदोलन केले. तरीही पोलीस भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. आता सर्वत्र पाऊस असल्याने अनेक ठिकाणी पावसामुळे मैदानी चाचण्या पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत. पुढे ढकलण्यात आलेल्या मैदानी चाचण्या लवकरात लवकर घेण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
उमेदवारांच्या भल्यासाठीच पावसाळ्यात भरती : फडणवीस
राज्यात पाऊस पडतो आहे. त्यामुळे काही ठिकाणी मैदानी चाचण्या घेणे शक्य नाही. राज्यात पाऊस आणखी वाढण्याची शक्यता आहे. पुढे विधानसभा निवडणूक येत आहे. त्यामुळे राज्यात आचारसंहिता लागू होणार आहे. आचारसंहितेपूर्वी मैदानी चाचण्या लवकर घेण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. कारण मैदानी चाचण्या पुढे ढकल्यास अनेक मुलांच्या वयाचा प्रश्न निर्माण होतो.
भरतीचे वय संपल्यामुळे त्यांना कायमचे भरतीला मुकावे लागते. त्यामुळे ज्या ठिकाणी पाऊस नाही, अशा ठिकाणी चाचण्या सुरू आहेत. अनेक ठिकाणी भरतीसाठी आलेली मुले रोडवर झोपलेली पहायाला मिळत आहे. त्यांची व्यवस्था करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत, असे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
भरतीसाठी लाखो उमेदवार मैदानात
राज्यात 19 जूनपासून पोलीस भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यासाठी एकूण 17 हजार 471 जागांसाठी 17 लाख 76 हजार 256 उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले. बँड्समनच्या 41, कारागृह विभागात कॉन्स्टेबलच्या 1 हजार 686, ड्रायव्हरच्या 1 हजार 686, पोलीस हवालदाराच्या 9 हजार 595, शीघ्र कृती दलाच्या 4 हजार 349 पदांसाठी उमेदवारांनी भरतीची तयारी केली आहे. अनेक ठिकाणी पावसामुळे भरती प्रक्रिया पुढे ढकलावी लागत आहे.