महाराष्ट्र

Lok Sabha Election : वन बुलढाणा मिशनचे संदीप शेळकेंचा अर्ज दाखल

Buldhana Constituency : भव्य रॅली, जाहीर सभेच्या माध्यमातून केले शक्तीप्रदर्शन

Buldhana Constituency : वन बुलडाणा मिशनचे संस्थापक संदीप शेळके लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. परिवर्तन रथयात्रेच्या माध्यमातून संपूर्ण बुलढाणा जिल्हा त्यांनी पिंजून काढला. त्यांनी आज बुधवारी लोकसभा उमेदवारीचा अर्ज दाखल केला आहे. यावेळी भव्य रॅली आणि जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. 

बुलढाणा जिल्ह्यातील कष्टकरी, शेतकरी, तसेच तरुणांच्या भवितव्यासाठी संदीप शेळके यांनी लोकसभा निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्याचा कायापालट करण्यासाठी आपण कटीबद्ध असून विकासाच्या मुद्द्यांवर ही निवडणूक लढवणार असल्याचे संदीप शेळके यांचे म्हणणे आहे. दहा महिन्यांपूर्वी संदीप शेळके यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्धार केला होता. त्यादृष्टीने जिल्हाभर परिवर्तन रथयात्रेच्या माध्यमातून त्यांनी जनतेशी संवाद साधला. यादरम्यान त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळाला.

Lok Sabha Election : जिल्हाधिकारी कार्यालयात शिवसैनिकांचा धिंगाणा

यामध्ये आज बुधवारी त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. सकाळी 10 वाजता जिजामाता प्रेक्षागर जवळील टिळक नाट्य क्रीडा मंडळाच्या मैदानात जाहीर सभा व त्यानंतर संगम चौक, गांधी भवन, बाजार गल्ली, सोनार गल्ली, कारंजा चौक, भोंडे सरकार चौक तर एडेड चौक या मार्गाने भव्य रॅली निघाली होती. त्यानंतर संदीप शेळके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. जिल्ह्याच्या विकासासाठी जिल्हाभरातील गावखेड्यातील तमाम शेतकरी, कष्टकरी ,शहरी नागरिकांनी यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन वन बुलडाणा मिशनच्या वतीने करण्यात आल्याने प्रेक्षागार कार्यालयासमोर मोठी गर्दी दिसून आली. यावेळी त्यांनी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधताना जनतेने मला जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी संधी द्यावी असे आवाहन त्यांनी केले.

सहा उमेदवारांचे अर्ज

बुलडाणा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी काल मंगळवारी 6 उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले. उमेदवारांनी त्यांचे नामांकन अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. किरण पाटील यांच्याकडे सादर केले. दरम्यान उद्या दि. 4 एप्रिल ही नामांकन अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. मंगळवारी बुलडाणा लोकसभा निवडणुकीसाठी 4 जणांनी 6 अर्जाची उचल केली. दरम्यान सहा उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहे.

आतापर्यंत 53 जणांनी 124 अर्जाची उचली केली आहे. तर 8 उमेदवारांनी 14 नामांकन अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये प्रतापराव गणपतराव जाधव – शिवसेना, रेखा कैलास पोफळकर – अपक्ष, प्रताप पंढरीनाथ पाटील – बहुजन मुक्ती पक्ष, रविकांत चंद्रदास तुपकर – अपक्ष, असलम शहा हसन शहा – महाराष्ट्र विकास आघाडी, मोहंमद हसन इनामदार – मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.दाखल करण्यात आलेल्या नामनिर्देशन पत्रांची दि. 5 एप्रिल रोजी छाननी करण्यात येणार आहे. तसेच दि. 8 एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. दि. 26 एप्रिल रोजी मतदान होणार असून दि. 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणुकीची रंगत वाढत असलेली दिसते. भर उन्हात फिरून प्रचार केला जातो आहे. येत्या काळात आपल्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मोठ्या नेत्यांच्या सभा होतील. यावेळी समीकरणे बदलली असल्याने चांगलाच धुरळा उडणार असे दिसते.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!