Appointment At One Place : गोदिया जिल्हाधिकारी कार्यालयात लाडका कर्मचारी योजना सुरू आहे. बदलीच्या नियमांना हरताळ फासला गेला आहे. तब्बल आठ कर्मचारी नियुक्तीच्या तारखेपासून एकाच ठिकाणी ठाण मांडून आहेत. गोंदिया प्रशासनाला याची माहिती नसेल असे कसे होईल? त्यामुळे हे आठ कर्मचारी प्रशासनाचे लाडके असल्याची ओरड सुरू झाली आहे. महसूल विभागाचे केंद्रस्थान असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयासह इतर विभागातही ही अवस्था असू शकते.
जिल्हाधिकारी कार्यालयाअंतर्गत आठ कर्मचारी नियुक्तीच्या तारखेपासून आपल्या मूळ कार्यालयात फक्त नाममात्र रूजू झालेत. त्यांची सेवा इतर कार्यालयाशी संलग्न आहे. मात्र ते काम वेगळ्याच कार्यालयात करतात. जिल्हाधिकारी कार्यालयात हा प्रकार अनेक वर्षांपासून सुरू आहे. अनेक वर्षानुवर्षांपासून एकाच ठिकाणी कार्यरत आहेत. कर्मचाऱ्यांनीही अनेकदा प्रशासनाला विनंती केली. परंतु त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. संबंधिताच्या हिताचे अधिकारी कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वाच्या पदांवर नियुती देत आहेत.
कामावर परिणाम
बदली संदर्भातील सर्व नियम धाब्यावर बसवित फक्त कर्मचारी अधिकाऱ्यांची जवळीक जोपासली जात आहे. हा एकच निकष जिल्हाधिकारी कार्यालयात लावला जात आहे. एखाद्या कर्मचाऱ्याने एका ठिकाणी सहा वर्षे सेवा केली असेल तर त्याची बदली केली जात नाही. नियमातून पळवाट शोधली जाते. अशा कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीनंतर सेवागणना होते. पदोन्नतीनंतर पुन्हा त्याच ठिकाणी नियुक्ती झाल्याचे चित्र तयार केले जाते. अनेक कर्मचाऱ्यांची नियुक्ती केवळ कागदोपत्री अन्य ठिकाणी आहे. मात्र ते वर्षानुवर्षांपासून एकच काम करतात. त्यामुळे या कर्मचाऱ्यांचे लागेबांधे असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अधिकारी किंवा राजकीय शिफारस वापरत बदली रोकली जात असावी, असाही संशय आहे.
सेवासंलग्न या पर्यायाखाली त्यांना वर्षानुवर्षे एका ठिकाणी कार्यरत ठेवले जात आहे. हा गोंदियाल देवरी (Deori) तालुक्यात बघायला मिळतो. तालुक्याबाहेरील कर्मचाऱ्यांची पदस्थापना किंवा सेवासंलग्न जिल्हाधिकारी कार्यालयात केली जाते. जिल्हाधिकारी कार्यालयातील कार्यरत कर्मचाऱ्यांना इतर ठिकाणी पाठविले जाते. अन्य तालुक्यांच्या तहसील किंवा उपविभागीय कार्यालयात (SDO) त्यांना संलग्न केले जाते. त्यामुळे हा प्रकार संशयाला वाव देणारा आहे. काही कर्मचारी तर नियुक्तीच्या दिवसापासून एकाच ठिकाणी आहेत. कानोकान खबर न होता हा प्रकार सुरू आहे. लाडका कर्मचारी योजनेबाबत गोंदियाचे जिल्हाधिकारी प्रदीप नायर माहिती घेतील का? ही योजना मोडीत काढतील का? हा प्रश्न निर्माण होत आहे.