Gadchiroli Chimur constituency : गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात समाविष्ट असलेला गोंदिया जिल्ह्यातील आमगाव मतदारसंघ हा अनुसूचित जमाती (एसटी) करिता राखीव आहे. विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात दोनदा काँग्रेसला तर एकदा भाजपला संधी मिळाली आहे. कुणालाही विजयाची सलग संधी न देणारा मतदारसंघ म्हणून आमगाव (गोंदिया) विधानसभा मतदारसंघाची ओळख आहे. विद्यमान आमदार सहषराम कोरोटे यांच्यापुढे लोकसभेत काँग्रेसच्या उमेदवाराला या मतदारसंघातून लीड मिळवून देण्याचे आव्हान असणार आहे.
Lok Sabha Election : गडचिरोलीत काँग्रेसमध्ये चाललंय तरी काय?
गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघाचा विस्तार तब्बल 500 किमी उत्तर-दक्षिण अंतर आणि गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदिया जिल्ह्यात आहे. त्यामुळे हा मतदारसंघ पिंजून काढताना उमेदवारांची दमछाक होते. यंदा भाजपकडून सलग दुसऱ्यांदा अशोक नेते हे रिंगणात आहेत. तर काँग्रेसने नवा गडी नवा डाव म्हणत डॉ. नामदेव किरसान यांना संधी दिली आहे. या लोकसभा मतदारसंघात गोंदिया जिल्ह्यातील आमगाव या मतदारसंघाचा समावेश आहे. या मतदारसंघात गोंदिया जिल्ह्यातील आमगाव, देवरी, सालेकसा या तीन तालुक्यांचा समावेश असून हे तिन्ही तालुके आदिवासी बहुल आणि दुर्गम म्हणून ओळखले जातात.सध्या मतदारसंघाचे नेतृत्व काँग्रेसचे आमदार सहषराम कोरोटे हे करीत आहेत. कोरोटे यांनी सन 2019 च्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार संजय पुराम यांचा 7420 मतांनी पराभव केला होता.कोरोटे यांना 88,265 मते मिळाली तर पुराम यांना 80,845 मते मिळाली होती. तर माजी आमदार रामरतनबापू राऊत यांना केवळ 3546 मते मिळाली होती.
काँग्रेसचे उमेदवार रामरतनबापू राऊत हे सन 2009 च्या निवडणुकीत 64,925 मते घेऊन निवडून आले होते. त्यांनी भाजपचे रमेश ताराम यांचा पराभव केला होता. तर सन 2014 मध्ये भाजपचे उमेदवार संजय पुराम हे 62,590 मतांनी निवडून आले होते. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार रामरतनबापू राऊत यांचा 18 हजार 295 मतांनी पराभव केला होता.आमगाव विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसचे वर्चस्व असले तरी स्थानिक स्वराज्य संस्थांवर हे वर्चस्व कायम ठेवण्यात ते अपयशी ठरले आहेत. देवरी नगरपंचायत, दोन पंचायत समिती आणि कृषी उत्पन्न बाजार समितीवर भाजपचे वर्चस्व आहे. तर पाच जिल्हा परिषद क्षेत्रांपैकी दोन जि.प.क्षेत्रांवर भाजप तर काँग्रेसचे तीन जि.प.क्षेत्र, एक पंचायत समिती व 35 वर ग्रामपंचायतींवर वर्चस्व आहे. ही सर्व बाब लक्षात घेता काँग्रेस चे आमदार सहषराम कोरोटेंची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.