महाराष्ट्र

Akash Fundkar : मंत्रिपदाचा वादा पूर्ण, पालकमंत्रीपदावर दावा नाही!

Buldhana : कामगार मंत्री फुंडकरांनी जिल्ह्यात येताच घेतले गजानन महाराजांचे दर्शन

कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आज रविवारी (23 डिसेंबर) प्रथमच ते बुलढाणा जिल्ह्यात आले. येताच त्यांनी शेगावचे संत गजानन महाराजांचे दर्शन घेतले. त्यांच्या सोबत त्यांचे कुटुंब होते. कामगार मंत्रालय फार मोठे असून कामगारांचे प्रश्न सोडवायचे आहेत. बेरोजगारांना काम द्यायचे आहे. त्यासाठी अभ्यास करून कामकाजाला सुरुवात करणार आहे, असे फुंडकर म्हणाले. 

पालकमंत्री पदावर आपण दावा केला नाही. पार्टी जो आदेश देईल, ते काम मी करत असतो, अशी प्रतिक्रिया फुंडकर यांनी दिली. मागील आठवड्यात राज्याच्या मंत्री मंडळाच्या विस्तारांनंतर काल शनिवारी (22 डिसेंबर) सायंकाळी खातेवाटप करण्यात आले. यामध्ये खामगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार अॅड. आकाश फुंडकर यांना कामगार खाते देण्यात आले.

आज रविवारी फुंडकर हे प्रथमच जिल्ह्यात दाखल झाले. त्यांनी सर्व प्रथम संत नगरी शेगावात पोहचून श्री संत गजानन महाराजांच्या मंदिरात त्यांच्या समाधी स्थळासमोर नतमस्तक झाले. यावेळी संस्थांच्यावतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी माजी मंत्री तथा जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. संजय कुटे त्यांच्यासोबत उपस्थित होते.

शहरातून काढली मोठी रॅली..

कामगार मंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर आज रविवारी शेगावातून मोठी रॅली काढण्यात आली. यानंतर शहरातील विविध कार्यक्रमांना त्यांनी हजेरी लावली. यावेळी श्री गजानन महाराज मंदिर परिसरातून विश्राम भवनापर्यंत फुंडकरांची रॅली काढण्यात आली. यावेळी या भागाचे आमदार डॉ. संजय कुटे आणि आकाश फुंडकर यांनी नागरिकांना अभिवादन करीत स्वागत स्वीकारले.

खामगाव शहरातही जंगी स्वागत.. 

मंत्री पदासाठी कुठलीही लॉबिंग न करता पक्षश्रेष्ठींनी थेट कॅबिनेट मंत्रीपद बहाल केले. यानंतर खामगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आकाश फुंडकर आठवडाभरानंतर प्रथमच आपल्या होमटाऊनमध्ये दाखल झाले होते. यावेळी शहराच्या सीमेपासून त्यांच्या निवासस्थानापर्यंत खामगावकरांनी त्यांचे ठिकठिकाणी स्वागत केले. यावेळी त्यांची मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये महायुतीमधील भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होता.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!