निवडणुकीचे वारे वहायला लागले की प्रत्येकच इच्छुक उमेदवार आपले तिकीट कन्फर्म असल्याचे सांगत सुटतो. गुडघ्याला बाशिंग बांधून असणारे अनेक इच्छुक उमेदवार सर्वच पक्षात असतात. आपलेच तिकीट कसे कन्फर्म आहे हे सगळ्यांना सांगत सुटतात. त्यामुळे सर्वच पक्षांमध्ये अंतर्गत मतभेद सुरू झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एकाच वाक्यात विषय संपवला आहे. त्यांनी ‘कोणाचंही तिकीट फायनल नाही’ असं सांगितलं आहे.
भाजपमध्ये अजून तरी कोणाचीही उमेदवारी कन्फर्म झालेली नाही. कुणाला उमेदवारी द्यायची, याचा निर्णय पक्षश्रेष्ठी बैठकीत घेतील, असं बावनकुळे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे अनेक इच्छुक उमेदवारांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. वर्धा जिल्ह्यातील आर्वी व धामणगाव या दोन विधानसभा क्षेत्रांचा आढावा चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला. वर्धेत आले असता त्यांनी गुडघ्याला बाशिंग बांधून असलेल्या अनेक इच्छुक उमेदवारांना कडक शब्दात इशारा दिला. लोकसभा निवडणुकीमध्ये अपयश आले. त्यामुळे प्रत्येक बुथवर मतांची संख्या कशी वाढेल यादृष्टीने प्रयत्न करावा. त्याचदृष्टीने विधानसभेच्या निवडणुकीच्या तयारीला लागायचे आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आता प्रत्येक बुथवर जाऊन मतं वाढण्यासाठी प्रयत्न करावेत, असा सल्लाही त्यांनी यावेळी बैठकीत दिला .
आर्वी विधानसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार केचे व फडणवीस यांचे विश्वासू सुमित वानखेडे असे दोन प्रबळ दावेदार आहेत. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या आढावा बैठकीनंतर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर कुणाला उमेदवारी मिळेल याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.
FIR Registered : आमदार नितेश राणेंवर गुन्हा; आक्षेपार्ह विधान भोवलं
बैठकींपेक्षा प्रत्यक्ष कामावर भर द्या
प्रत्यक्ष मतदारांपर्यंत जाऊन पोहोचत काम करण्यापेक्षा पक्षातर्फे बैठकाच अधिक होत आहेत. त्यामुळे त्यातच जास्त वेळ जातो आहे. या बैठका कमी करून प्रत्यक्ष काम करण्यास कार्यकर्त्यांनी वेळ द्यावा. असंही मत यावेळी बावनकुळे यांच्यासमोर काही पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलं.
भाजपपुढे मोठं आव्हान!
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होते. एकनाथ शिंदे आणि ४० आमदार उद्धव यांची साथ सोडून बाहेर पडले. भाजपने त्यांच्यासोबत सत्ता स्थापन केली. त्यानंतर सरकार व्यवस्थित सुरू असताना भाजपने राष्ट्रवादीला सोबत घेतले. लोकसभा निवडणुकीत तिन्ही पक्षांमध्ये जागावाटपावरून बरेच मतभेद होते. त्याचा फटकाही महायुतीला बसला. आता विधानसभा निवडणुकीत जागावाटप करताना, उमेदवारी देताना याच आव्हानांचा सामना भाजपला करावा लागणार आहे.