Political war बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पायाला स्पर्श केला. झालेल्या या प्रकारावर राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे. लोकसभा निवडणुकीत 2024 मध्ये बहुमत मिळाल्यानंतर एनडीए आघाडीने सलग तिसऱ्यांदा सरकार स्थापन केले. सरकार स्थापनेचा दावा करण्यापूर्वी एनडीए आघाडीची जुन्या संसद भवनात बैठक झाली. ज्यामध्ये आघाडीतील सर्व पक्षांचे नेते सहभागी झाले होते. या भेटीदरम्यान नितीश कुमार नरेंद्र मोदींना भेटले तेव्हा त्यांनी मोदींच्या पायाला हात लावण्याचा प्रयत्न केला. परंतू, पंतप्रधान मोदींनी त्यांना मध्येच थांबवले आणि नितीश कुमारांना मिठी मारली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.
का भडकले प्रशांत किशोर?
प्रशांत किशोर सध्या ‘जन सूरज’ मोहिमेत सहभागी आहेत. भागलपूर येथे लोकांना संबोधित करताना ही टीका केली. त्यांच्यातील विवेकबुद्धी आता कमी होत चाललली आहे, अशी टीका प्रशांत किशोर यांनी केली आहे. प्रशांत किशोर यांनी 2015 मध्ये नितीश कुमार यांच्या प्रचाराची धुरा सांभाळली होती. बिहारच्या मुलांना रोजगार मागितला नाही. बिहारमधील जिल्ह्यांमध्ये साखर कारखाने सुरू करावेत, अशी मागणी नव्हती. बिहारला विशेष राज्याचा दर्जा मिळावा, अशी मागणी नव्हती. बिहारचे लोक विचार करत असतील की मग त्यांनी काय मागितले? 2025 नंतरही मुख्यमंत्री राहावे आणि भाजपनेही पाठिंबा द्यावा, अशी मागणी नितीशकुमार यांनी केली. त्यांनी बिहारच्या सर्व जनतेची इज्जत विकली असे ते म्हणाले.
विरोधात बोलणाऱ्यांचे तोंड बंद होईल
एनडीए आघाडीच्या बैठकीत नितीशकुमार यांनी नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्याचे समर्थन केले. नरेंद्र मोदींना प्रत्येक मुद्द्यावर पाठिंबा देण्याची घोषणा त्यांनी केली. विरोधकांबाबत बिहारचे मुख्यमंत्री म्हणाले की, जो कोणी विरोधात बोलत असेल त्याचे तोंड बंद होईल काळजी करू नका.