Assembly Election : विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर प्रदेशाध्यक्ष झालेल्या आमदार नाना पटोले यांची सध्या काँग्रेसमध्ये बऱ्यापैकी चलती आहे. अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर महाविकास आघाडी सरकारमध्ये ऊर्जामंत्री असलेल्या नितीन राऊत यांच्या पदावर नाना पटोले हे डोळा ठेवून होते, अशी चर्चा असलेल्या काँग्रेसमध्ये आता नितीन राऊत हे पुन्हा प्रवाहात येण्यासाठी धडपड करीत आहेत.
महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळामध्ये नितीन राऊत हे ऊर्जामंत्री होते. देशभरामध्ये कोविडची महासाथ सुरू होती. महाराष्ट्रमध्ये तर भीषण परिस्थिती होती. अनेक दिवसांच्या लॉकडाऊनमुळे राज्यभरातील लाखो उद्योगांसमोर टिकून राहण्याचा प्रश्न होता. अशा परिस्थितीत ऊर्जामंत्री या नात्याने नितीन राऊत यांनी महत्त्वाची घोषणा केली होती. मात्र त्यांच्या या घोषणेचा ‘फ्युज’ त्यांच्याच सरकारने उडवला होता.
माफी नाहीच
महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात ऊर्जामंत्री असताना नितीन राऊत यांनी विजबिल माफीची घोषणा केली होती. आता स्वतः ऊर्जा मंत्र्यांनीच ही घोषणा केली म्हटल्यावर राज्यभरातील उद्योजक निश्चिंत झालेत. घरगुती वीज वापर करणाऱ्या अनेकांनी देखील त्यावेळी विजबिल भरले नाही. ‘राऊत साहेबांनी एक बार जो बोल दिया सो बोल दिया’, असा लोकांचा समज झाला. मात्र नितीन राऊत यांची ही घोषणा पोकळ ठरली.
काँग्रेस आणि महाविकास आघाडीने कॅबिनेट मंत्री या जबाबदार पदावर असलेल्या नितीन राऊत यांना तोंडघशी पाडले. विजबिल माफी दिली जाणार नाही, अशी घोषणा सरकारने केली. त्यामुळे नितीन राऊत हे कॅबिनेट मंत्री असूनही त्यांचे सरकार मध्ये काहीच वजन नाही, त्यांच्या शब्दाला सरकारमध्ये काहीच किंमत नाही असा थेट संदेश काँग्रेस आणि सरकारने लोकांना दिला.
दुसऱ्यांदा नितीन राऊत त्यावेळी तोंडघशी पडले, ज्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोविडच्या काळामध्ये विजेचे दिवे बंद करून दिवे किंवा मेणबत्ती लावण्याचे आवाहन केले. मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत लोकांनी एकाच वेळी सगळे दिवे बंद केले तर पावरग्रिड फेल होऊ शकते, असे ऊर्जामंत्री नितीन राऊत सांगून मोकळे झाले. काँग्रेसच्या सांगण्यावरूनच महावितरणच्या अनेक अधिकाऱ्यांनी त्यावेळी राऊत यांची दिशाभूल केली असं आता सांगण्यात येत आहे.
ऊर्जा विभागाचा तसा कोणताही अभ्यास नसलेल्या राऊत यांनी देखील पत्रकार परिषद घेत पावरग्रिड फेल होईल. महाराष्ट्र सहज देश काळोखात बुडेल असं जाहीर करून टाकलं. मात्र असं काहीही झालं नाही. मोदी यांच्या आवाहनानुसार देशभरातील लाखो लोकांनी एकाच वेळी दिवे बंद केले. पणत्या आणि मेणबत्ती लावल्या. मात्र पावर ग्रिडवर कोणताही परिणाम झाला नाही. त्यामुळे पुन्हा एकदा नितीन राऊत यांचा हसू झालं.
काँग्रेसने अडगळीत टाकलं
नाना पटोले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाल्यावर नितीन राऊत यांना ‘साइड ट्रॅक’ करण्यात आलं. नितीन राऊत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असतानाही अनेक बैठकींमध्ये ते दिसेनासे झालेत. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कंपूतील नेते म्हणजेच काँग्रेस, असं समीकरण महाराष्ट्रात तयार झालं. त्यामुळे अनेक वर्षांपासून काँग्रेसमध्ये असलेल्या नितीन राऊत यांना कोणी विचारेना असं झालं. राहुल गांधी यांच्या मनातही नितीन राऊत यांच्या विरोधात काँग्रेसच्या नेत्यांनी प्रचंड विष पेरलं. त्यामुळे दलित समाजाच्या या सक्षमनेत्यावर काँग्रेसमधूनच अन्याय सुरू झाला. नाना पटोले यांना विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर एका मोठ्या नेत्याच्या सांगण्यावरून ऊर्जामंत्रिपद नितीन राऊत यांच्याकडून हिसकावून घ्यायचे होते.
एकमेकांचे छुपे मित्र असल्यामुळे नानांना ऊर्जा मंत्री पद प्राप्त करून दिल्लीत प्रचंड वजन असलेल्या एका नेत्याच्या मागे लागण्याची इच्छेची राज्यातील एका नेत्याच्या सांगण्यावरून ‘पूर्ती’ करायची होती, असा आरोप आता राऊत समर्थकांकडून होत आहे. मात्र राऊत यांनी हा मनसुबा पूर्ण होऊन दिला नाही. त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार गेल्यानंतर राऊत यांना अळगळी टाकण्यात आल्याचा आता बोललं जात. स्वतः मंत्री असतानाही कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत रीतसर ठराव न घेता विजबिल माफीची घोषणा राऊत यांच्या अंगलट आली.
पावर ग्रिड आणि मुंबईमधील वीज पुरवठा ठप्प झाल्याचे मुद्द्यावर ‘सायबर हल्ला’ असा अहवाल सादर करून घेतल्याच्या मुद्द्यावरही नितीन राऊत यांचा चांगलंच हसू झालं. सायबर हल्ला कसा झाला? कोणी केला, याचा अहवाल सादर झाला. पण तो इंटरनेटवर कुठेच नाही. त्यामुळे हा दावा हवेत गोळीबार दोन ठार, असा पोकळ ठरला. अशा कृतीमुळे राऊत यांना काँग्रेसने ‘साइड ट्रॅक’ केल्याचं सांगितलं जात आहे. या सर्व परिस्थितीमध्ये सध्या ते त्याच काँग्रेससाठी आणि महाविकास आघाडीसाठी मतं मागत आहेत, ज्यांनी त्यांच्याच शब्दाचं ‘सर्किट फेल’ केलं.