महाराष्ट्र

Mahavikas Aghadi : काँग्रेस बड़े मियाँ तर आघाडी छोटे मियाँ

Assembly Election : मुख्यमंत्रिपदाची ‘कुर्बानी’ कोण देणार? 

Statement From Congress : राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहात आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी आणि नेत्यांनी निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप करीत आहेत. नेत्यांचे राज्यभर दौरे सुरू आहेत. महाविकास आघाडीत मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण? यावर चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. यावर राजकीय प्रतिक्रियाही उमटू लागल्या आहे. उद्धव ठाकरे ते नाना पटोलेंपर्यंत अनेकांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. आता काँग्रेसचे नेते आमदार डॉ. नितिन राऊत यांनी याबाबत भाष्य केले आहे.

मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याबाबत अनेक प्रश्न राजकीय वर्तुळात विचारले जात आहेत. मुख्यमंत्रिपदाचा प्रश्नच समोर येत नाही. काँग्रेस कधीच मुख्यमंत्रिपदाचा चेहरा समोर ठेवून निवडणुक लढत नाही. काँग्रेस महाविकास आघाडीमध्ये मोठा भाऊ आहे. मुख्यमंत्रिपदाचा दावा कुणी सोडत नाही, असे काँग्रेस नेते डॉ. नितीन राऊत यांनी म्हटले आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

महाराष्ट्रातील महाविकास आघाडी मजबूत आहे. या आघाडीला कोणीही हलवू शकत नाही. तीन पक्ष मिळून चांगले काम करत आहेत. राहुल गांधी (Rahul Gandi) यांनी ‘डरो मत’चा संदेश दिला आहे. न घाबरता ते काम करीत आहेत. आमचा चेहरा हा एकमात्र चेहरा आहे. हा चेहरा म्हणजे राहुल गांधी आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी आमचा चेहरा राहुल गांधीच असतील, असेही डॉ. राऊत यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री कोण?

महाविकास आघाडीच्या मेळाव्यात मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करण्याची मागणी उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांनी केली होती. महाविकास आघाडीत मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. मुख्यमंत्रिपदाचा चेहरा मी होणार की, दुसरा कुणी होणार? हा प्रश्न होता. आता पृथ्वीराज चव्हाण, शरद पवार यांनी एक नाव जाहीर करावे. माझा तुमच्या निर्णयाला पाठिंबा असेल, असे ठाकरे म्हणाले होते.

Ravikant Tupkar : आंदोलनाचा परिणाम; खाद्य तेलावरील आयात शुल्क वाढले

मुख्यमंत्रिपदाबाबत विरोधकांकडून काडी पेटवली जात आहे. महाविकास आघाडीत मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यावरून वाद लावले जात आहेत. त्यामुळे जे नाव असेल, ते जाहीर करावे, अशी मागणी ठाकरे यांनी केली होती. उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याला उत्तर देताना शरद पवार म्हणाले होते की, मुख्यमंत्री पदाचा निर्णय निवडणुकीनंतर संख्याबळावर होणार आहे. आताच मुख्यमंत्री पदाचे नाव जाहीर व्हावे, अशा आग्रहाची गरज नाही. काँग्रेस, उद्धव ठाकरे गट किंवा राष्ट्रवादी काँग्रेस कोणाचाही मुख्यमंत्री होऊ शकतो. तीनही पक्ष एकत्र येऊन निर्णय घेऊ. स्थिर सरकार देऊ. स्थिर सरकार देणे, हे उद्दिष्ट आहे, असे पवार म्हणाले होते. ज्या पक्षाचे जास्त आमदार त्या पक्षाचा मुख्यमंत्री, असा सल्ला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला होता. अशातच डॉ. नितीन राऊत यांचे विधान महत्वपूर्ण मानले जात आहे.

अचानक ‘यु-टर्न’

शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्या नावाची घोषणाच केली. नंतर त्यांनी आपला सूर बदलला. तीन पक्षांची मिळून महाविकास आघाडी आहे. तिघांमध्ये एकमत आहे. कोण किती जागा जिंकणार, यानंतर मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरवला जाईल, असे राऊत म्हणाले. सद्य:स्थितील राज्यातील महाभ्रष्ट सरकारला संपविण्याचे उद्दिष्ट डोळ्यापुढे आहे. उद्धव ठाकरे गटाने आता मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याबाबतचा आग्रह सोडल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला ऊत आला आहे. अशातच डॉ. राऊत यांनी दिलेल्या संकेतामुळे मुख्यमंत्रिपदासाठी काँग्रेस पुढे असल्याचे बोलले जात आहे.

error: Content is protected !!