महाराष्ट्र

Nagpur : गडकरी म्हणाले, ‘पंतप्रधानपद हे माझे ध्येय नाही’

Nitin Gadkari : विरोधी पक्षाच्या नेत्याकडून आलेल्या ऑफरचा उल्लेख

Prime Ministership : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे नाव पंतप्रधानपदाच्या शर्यतीत गेल्या दहा वर्षांपासून आहे. नरेंद्र मोदींनंतर या पदासाठी कायम गडकरींचाच उल्लेख झाला आहे. 2019 मध्ये तर गडकरीच पंतप्रधान होणार, असा दावा अनेकांनी केला होता. अर्थात त्यात किती तथ्य होते, हे सांगता येणार नाही. काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी गडकरींना महाविकास आघाडीत येण्याची जाहीर ऑफर दिली होती. या संपूर्ण पार्श्वभूमीवर गडकरी स्वतः मात्र पहिल्यांदा या विषयावर बोलले आहेत.

..तर आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ

‘काही दिवसांपूर्वी एक घटना घडली. मी या घटनेमधील नेत्याचे नाव सांगत नाही. पण त्याने मला म्हटलं की, तुम्ही पंतप्रधान होणार असाल तर आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ,’ असा गौप्यस्फोट गडकरींनी केला. खरं तर गडकरींच्या या विधानात आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही. यापूर्वी अनेकदा अनेक नेते गडकरी पंतप्रधान व्हावेत असं जाहीरपणे बोलले आहेत. पण गडकरी स्वतः कधीच या विषयावर बोलले नाहीत. त्यामुळे त्यांच्या या विधानाची जास्त चर्चा होत आहे.

लोकप्रिय आणि कार्यक्षम केंद्रातील मंत्री म्हणून नितीन गडकरी यांची ओळख आहे. त्यांचं नाव अनेकदा देशाच्या पंतप्रधान पदासाठी चर्चेत आलं आहे. आता नितीन गडकरी यांनी नागपूरमधील एका कार्यक्रमात स्वतःच याबद्दल सांगितलं आहे. देशाच्या राजकारणात गेल्या अनेक वर्षांपासून गडकरी यांची एक वेगळी ओळख आहे. त्यांच्या बाबत अनेकदा पंतप्रधानपदासाठी चर्चा झाल्या. मोदींनंतर कोणीही दावेदार पुढं आले नाही.

2024 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान योगी आदित्यनाथ यांची पंतप्रधान पदासाठी चर्चा होती. ती केवळ अफवाच ठरली. नरेंद्र मोदीच पंतप्रधान झाले. आता पंतप्रधानपदावरून गडकरींनी मोठा गौप्यस्फोट केला. नितीन गडकरी यांनी नागपूरमधील या कार्यक्रमात आपल्या नेहमीच्या दिलखुलास शैलीत राजकीय फटकेबाजी केली. यावेळी त्यांनी हा गौप्यस्फोट केला आहे.

Nitin Gadkari : ‘स्टेनलेस स्टील वापरले असते तर पुतळा कोसळला नसता’

तुमचा पाठिंबा मी का घ्यावा?

‘तुम्ही पंतप्रधान होणार असाल तर आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ’, अशी ऑफर त्या नेत्याने दिली. त्यानंतर तुम्ही मला पंतप्रधानपदासाठी का पाठिंबा देणार आहात? आणि मी तो पाठिंबा का घ्यावा? असा सवाल मी त्याला केला. पंतप्रधानपद हे माझ्या आयुष्यातील ध्येय नाही. मी माझ्या तत्वांशी आणि पक्षसंघटनेशी एकनिष्ठ आहे. पंतप्रधानपदासाठी तत्त्वांशी आणि पक्षाशी प्रतारणा करणार नाही. ही तत्त्वच भारतीय लोकशाहीची सर्वात मोठी ताकद आहे, असं गडकरी म्हणाले.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!