ABVP Leadership : राजकारण काम करताना अनेक प्रकारांच्या लोकांशी संपर्क येतो. त्यामुळे कोणताही राग, द्वेष, मत्सर मनात न ठेवा काम करणाऱ्या दत्ताजी डिडोळकर यांचा फार्मूला आपण डोळ्यापुढे ठेवतो. दत्ताजी यांच्याकडे अनेक जण यायचे. त्यातील काही विरोधातील असायचे. तरीही दत्ताजी त्यांची आपुलकीने मदत करायचे. त्यांचा हाच स्वभाव आपण राजकीय आणि सामाजिक जीवनात अंगीकारण्याचा प्रयत्न करीत असल्याचे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे संस्थापक दत्ताजी डिडोळकर जन्मशताब्दी समारोहात ते बोलत होते. नागपुरात आयोजित या कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत (Mohan Bhagwat), अमरावती जिल्ह्यातील अंजनगावसुर्जी येथील देवनाथ पीठाचे पीठाधीश जितेंद्रनाथ महाराज आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना गडकरी यांनी दत्ताजी डिडोळकर यांच्या संपर्कात आल्यानंतर आपल्याला बरेच शिकायला मिळाले असे सांगितले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमुळे तरुण वयातच युवा वर्गाला शिस्त आणि नेतृत्वाचे धडे मिळतात असे ते म्हणाले.
सतत शिकण्यासारखे
दत्ताजी डिडोळकर यांच्याकडून सतत काहीतरी शिकायला मिळाले. अगदी कट्टर विरोधकालाही ते मदत करायचे. आपण त्यांना यासंदर्भात एकदा विचारलेही होते. त्यावेळी त्यांनी मत्सर, द्वेष बाळगत काय साध्य होणार असा प्रतिप्रश्न केला. दत्ताजी यांच्या या स्वभावामुळे ते लोकप्रिय झालेत. त्यांच्या याच स्वभावामुळे आपल्याला प्रेरणा मिळाली. दत्ताजी डिडोळकर यांचा हाच फार्मूला आपण अंगीकारण्याचा प्रयत्न करीत आहोत. राजकीय आणि सामाजिक आयुष्यात त्याचा फायदाही होत असल्याचे गडकरी म्हणाले.
शिक्षण क्षेत्रातही डिडोळकर यांनी अमुलाग्र योगदान प्रदान केले आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या (RTMNU) जडणघडणीत त्यांचा मोलाचा वाटा होता. संघ आणि संघाशी संबंधित संस्था, संघटनांमध्ये बडेजाव केला जात नाही. वाढदिवस आदी मोठ्या प्रमाणावर साजरा करण्याची पद्धत नाही. परंतु दत्ताजी डिडोळकर यांचे कार्य खरोखरच इतके मोठे आहे की, त्यांची जन्मशताब्दी साजरा करण्याचा मोह कोणालाही आवरला नाही. जन्मशताद्बी केवळ निमित्त आहे. दत्ताजी डिडोळकर यांच्या विचारांची, कार्याची उजळणी यातून होणार असल्याचे गौरवोद्गार नितीन गडकरी यांनी काढले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचाही तरुणाईला कसा फायदा होत आहे, याचे विस्तृत विवेचनही गडकरी यांनी केले. कार्यक्रमात अंजनगावसुर्जी मठाचे पीठाधीश जितेंद्रनाथ महाराज यांच्यासह मान्यवरांनी मार्गदर्शन केले.