लोक कायदा मोडून वाहन चालवत असतील, तर त्यांना कठोर दंड करा. लोकांमध्ये कायद्याबद्दल आदर नसेल तर भीती निर्माण करा, असे स्पष्ट निर्देश केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी (दि.२८) दिले.
नागपूर झीरो फॅटलिटी डिस्ट्रिक्ट रिव्यू आणि जिल्हा रस्ते सुरक्षा समिती बैठकीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी जिल्ह्यात गेल्या दीड वर्षांत झालेल्या अपघातांची माहिती घेतली. यात किती लोकांचा मृत्यू झाला, किती अपघातग्रस्त ठिकाणांचे ब्लॅक स्पॉट दुरुस्त केले याची माहिती त्यांनी अधिकाऱ्यांना मागितली. तसेच वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळले जातील, याची काळजी पोलिसांना घ्यायचीच आहे. शिवाय सर्वसामान्य नागरिकांनी देखील आवर्जून नियम पाळावे, यासाठी जनजागृती करावी, असेही ते म्हणाले. बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
दरवर्षी नागपूर जिल्ह्यात 1 हजार लोकांचा अपघातात बळी जाणे दुर्दैवी आहे. यामध्ये १८ ते ३५ वर्षे वयोगटातील तरुणांचा मृत्यू होतो, ही अत्यंत वेदनादायी बाब आहे. हे प्रमाण रोखण्यासाठी सर्व एजन्सीजने संवेदनशीलतेने आणि समन्वयातून काम करण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.
नागपूर शहरातील अपघातप्रवण ब्लॅक स्पॉट शोधले आहेत. त्यावर काम सुरू असल्याचं समाधान आहे, असे नितीन गडकरी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. शाळेसमोरील होणारे अपघात रोखण्यासाठी काम सुरू आहे. अतिक्रमण झाल्यामुळे पायदळ चालणाऱ्यांसोबत ‘हिट अँड रन’च्या घडतात. त्यातून मृत्यू होणाऱ्यांची संख्याही वाढत चालली आहे. फुटपाथवरील अतिक्रमणावर कठोर कारवाई झाली पाहिजे, असे आदेश अधिकाऱ्यांना दिल्याचेही गडकरींनी सांगितले.
जिल्हा रस्ते सुरक्षा समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटनकर, पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल, महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी , नागपूर ग्रामीणचे पोलीस अधिक्षक डॉ. हर्ष पोद्दार यांची बैठकीला उपस्थिती होती.
अद्ययावत असावी रुग्णवाहिका
कार आणि बसचा अपघात झाल्यास बरेचदा लोक आत अडकलेले असतात. अशावेळी रुग्णवाहिका पोहोचून जाते, पण लोकांना बाहेर काढणे शक्य होत नाही. बसचे पार्ट्स कापल्याशिवाय ते शक्य नाही. रुग्णवाहिकेत ही सोय नसते. त्यामुळे यापुढे सर्व टूल्स उपलब्ध असलेली अद्ययावत रुग्णवाहिका सज्ज असेल, असे प्रयत्न करण्याचे निर्देश नितीन गडकरी यांनी प्रशासनाला दिले आहेत.