BJP : उत्तर नागपुरातील आमदार खूप चांगले आहेत. या भागात झालेले प्रत्येक काम मीच केले आहे म्हणून सांगतात. एकदा एक कार्यकर्ता आला आणि म्हणाला, ‘साहेब… मला मुलगा झाला’. तर हे म्हणाले ‘माझ्याचमुळे झाला’… केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची उत्तर नागपुरातील ही टोलेबाजी सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. त्यांनी आपल्या भाषणातून उत्तर नागपूरचे काँग्रेसचे आमदार नितीन राऊत यांना लक्ष्य केले.
उत्तर नागपूरचे भाजप-महायुतीचे उमेदवार डॉ. मिलिंद माने, दक्षिण नागपूरचे उमेदवार मोहन मते आणि पूर्व नागपूरचे उमेदवार कृष्णा खोपडे यांच्या प्रचारार्थ गडकरींच्या जाहीर सभा आयोजित करण्यात आल्या. उत्तर नागपुरात बोलताना गडकरींनी जातीभेद विसरून विकासकामे केल्याचे सांगितले. ते म्हणाले, ‘उत्तर नागपुरात आम्ही भेदभाव केला नाही. जातीधर्माचे राजकारण केले नाही. मत नाही मिळाले तरीही रस्ते केले, पिण्याच्या पाण्याची सोय केली. कधीही जात डोक्यात ठेवली नाही. उलट काँग्रेसने जातीवादाचे विष कालवण्याचे काम केले. मला लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या तुलने उत्तर नागपुरातून 32 हजार मते कमी पडली. पण मी त्याचा विचार केला नाही.’
गेल्या दशकात नागपूर शहराचे चित्र वेगाने बदलले. रस्ते चांगले झाले. 75 टक्के जनतेला 12 ते 24 तास पिण्याचे पाणी मिळत आहे. आरोग्य आणि शिक्षणाच्या क्षेत्रात मोठ्या सुविधा निर्माण झाल्या आहेत. शहराचा चौफेर विकास झाला आणि सर्वांगीण विकासाच्या दिशेने आपण वाटचाल केली आहे. जनतेने जाती-पातीचा विचार न करता आम्हाला निवडून दिले आणि सेवा करण्याची संधी दिली. त्यामुळे शहराच्या विकासाचे संपूर्ण श्रेय नागपूरकरांना जाते, असं गडकरी म्हणाले. जेवढे काम आजपर्यंत झाले आहे, त्याच्या तिप्पट काम पुढील पाच वर्षांत होणार आहे, असा विश्वासही गडकरी यांनी व्यक्त केला.
Nitin Gadkari : मुनगंटीवारांमुळेच विकासाची बुलेट ट्रेन तिप्पट वेगानं धावेल
खोट्या प्रचाराला बळी पडू नका
आम्ही कधीही जातीयवादाचे राजकारण केले नाही. पण आमच्याबद्दल खोटा प्रचार झाला. आम्ही संविधान बदलणार आहोत, असे काँग्रेसने लोकांना सांगितले. आम्ही संविधान बदलणार नाही आणि कुणाला बदलू देणार नाही. ताजबाग, दीक्षाभूमीचा विकास आमच्या सरकारने केला. मुस्लिम असो किंवा दलित असो, योजनांचा फायदा सर्वांना दिला. मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा नक्कीच प्रयत्न होईल. पण मतदारांनी काँग्रेसच्या खोट्या प्रचाराला बळी पडू नये, असे आवाहन गडकरींनी केले.