Assembly Election : ‘काँग्रेस एक आश्चर्य है..उत्तर में हारती है तो दक्षिण में जितती है.. दक्षिण में हारती है तो उत्तर में जितती है.. काँग्रेस एक समस्या है.. समस्या ही काँग्रेस है. पुंजिपतीओं को दिलासा देती है और गरिबी हटाओ का नारा देती है’..’ प्रसिद्ध व्यंग कवी शरद जोशी यांची ही कविता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना सावनेरच्या सभेत म्हणून दाखवली. या कवितेचा आधार घेत त्यांनी काँग्रेसला चांगलेच धारेवर धरले.
गडकरी म्हणाले, ‘या देशाने साठ वर्षे काँग्रेसला संधी दिली. काँग्रेसनेही लोकांना खूप आश्वासने दिली. पहिले लोकांनी बैलजोडीवर ठप्पे मारले. नंतर गाय-वासरूवर ठप्पे मारले. मग पंज्यावर ठप्पे मारले. पुढे काँग्रेस फुटत गेली. रेड्डी काँग्रेस झाली, चड्डी काँग्रेस झाली. पुढे शरद पवार यांचीही काँग्रेस निर्माण झाली. हिंदीतील प्रसिद्ध व्यंगकवी स्व. शरद जोशी यांनी तर काँग्रेसवर एक कविताच लिहिली होती.’ त्यानंतर गडकरींनी कवितेच्या ओळी सांगितल्या.
सावनेर विधानसभा मतदारसंघाचे भाजप-महायुतीचे उमेदवार डॉ. आशीष देशमुख यांच्या प्रचारार्थ गडकरी यांची जाहीर सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते. गडकरी म्हणाले, ‘काँग्रसने देशात साठ वर्षे सत्ता उपभोगली. पण देशातील ग्रामीण भागाला विकासापासून वंचित ठेवले, उलट अटलजींच्या नेतृत्वातील सरकारने आणि आता नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने ग्रामीण भागाच्या विकासाला सर्वाधिक प्राधान्य दिले.’
काँग्रेसने गांधीजींचे फक्त नाव घेतले
गडकरी म्हणाले, ‘1947 पासून आजपर्यंत काँग्रेसने खूप घोषणा केल्या. देशाच्या भविष्याचे नुकसान केले. चुकीच्या पद्धतीने राज्य कारभार केला. स्टिलचे कारखाने टाकले, ते डुबले. हॉटेल टाकले, तेही डुबले. विकासाच्या बाबतीत काँग्रेसचे प्राधान्यच चुकले. खऱ्या अर्थाने गाव गरीब मजदूर आणि शेतकऱ्यांच्या विकासाला, सिंचनाला, कृषी मालावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांना, पाणी पुरवठा आणि रस्त्यांना प्राधान्य द्यायला हवे होते. मात्र, काँग्रेसने गावांकडे पूर्ण दुर्लक्ष केले. महात्मा गांधींनी रामराज्य आले पाहिजे, असे म्हटले होते. काँग्रेसच्या काळात कुठे होते रामराज्य? त्यांनी फक्त गांधीजींचे नाव घेतले. त्यांच्या विचारांचे अनुकरण केले नाही. आज देशातील परिस्थिती बदलायला सुरुवात झाली आहे.’