Nagpur : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक वृक्ष माँ के नाम’ या अभियानाची घोषणा केली. सत्ताधार आमदार-खासदार आणि मंत्र्यांनी त्यानुसार वृक्षलागवड सुरू केली आहे. अशात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या उद्यानात त्यांच्या आईच्या नावाने झाड लावले. निमित्त होते ऑक्सिजन बर्ड पार्कच्या उद्घाटनाचे.
गडकरी यांच्या संकल्पनेतून भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) नागपुरातील जामठा परिसरात ऑक्सिजन बर्ड पार्क साकारला आहे. या उद्यानाचे लोकार्पण गडकरी यांच्या हस्ते झाले. येथील नैसर्गिक तलावाच्या शेजारी गडकरींनी वृक्षारोपण केले. त्यांनी आईच्या नावाने वृक्षारोपण केले. या कार्यक्रमात बोलताना त्यांनी पंतप्रधान मोदींच्या अभियानाचाही आवर्जून उल्लेख केला.
एक वृक्ष माँ के नाम
‘पर्यावरणाच्या रक्षणासाठी वृक्ष लागवड मोठ्या प्रमाणात आवश्यक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक वृक्ष माँ के नाम’ हे अभियान घोषित केले. यामध्ये सर्वांनी सहभाग घेण्याची गरज आहे. देश प्रदूषणमुक्त करणे हा यामागचा अजेंडा आहे. याच धरतीवर एनएचआयने २०१५ मध्ये हरित महामार्गांचे धोरण आणले. गेल्या दहा वर्षांत आम्ही ४ कोटी झाडे लावली. ७ लाख झाडांचे ट्रान्सप्लान्टेशन केले. संपूर्ण महाराष्ट्रात जवळपास ५०० तलाव एनएचआयने बांधले. ऑक्सीजन बर्ड पार्क हा देखील हरित संकल्पाचाच एक भाग आहे.’
प्रदूषणमुक्त देशाचा निर्धार
पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज आहे. आपण सारे ध्वनी, वायू, जल प्रदूषणाचा सामना करीत आहोत. प्रदूषणामुळे आयुष्यमान कमी होत आहे. अशात पर्यावरण संवर्धनाची जाणीव प्रत्येकात निर्माण होणे आवश्यक आहे. त्याकडे लक्ष वेधण्यासाठी ‘ऑक्सीजन बर्ड पार्क’ हे उत्तम माध्यम ठरणार आहे. निसर्ग पर्यटनाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा उद्देश साध्य होणार आहे, असेही ते म्हणाले.
झाड कापणे म्हणजे हत्याच
एक झाड कापणे हे एका माणसाची हत्या करण्यासारखे आहे. त्यामुळे वृक्ष लागवडीसह ट्रान्सप्लान्टेशनवर आमचा भर आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाद्वारे रस्ते निर्मिती सोबतच अनेक पर्यावरण संवर्धनाची कामे केली जात आहेत. वणी-वरोरा या रस्त्यावर बांबूच्या पर्यावरण पूरक क्रॅश बॅरियरची बांधणी, उड्डाणपुलाच्या बांधकामांमध्ये स्टील ऐवजी ग्लास फायबरचा वापर, रस्ते निर्मितीमध्ये म्युनिसिपल वेस्टचा वापर, रस्ते निर्मितीसाठी तलाव खोलीकरणातून मिळणाऱ्या मातीचा वापर केला जात आहे. आम्ही पर्यावरण खराब करणारे नव्हे तर पर्यावरणाचे संवर्धन करणारे आहोत, हेच आम्हाला सांगायचे आहे, असेही गडकरी म्हणाले.
गडकरींच्या कार्यक्रमाला काँग्रेसचे खासदार
या कार्यक्रमाला रामटेकचे खासदार आणि काँग्रेसनेते श्यामकुमार बर्वे यांची उपस्थिती होती. ते कार्यक्रमाला येताच सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. खरं तर हा कार्यक्रम एनएचएआयचा होता. त्यामुळे आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नव्हते. पण निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या खासदाराने भाजप नेत्याच्या बाजुला जाऊन बसणे नक्कीच चर्चेचा विषय आहे. गडकरींनी तर त्याहीपुढे जाऊन बर्वे यांना भाषण करायला सांगितले. त्यानंतर बर्वे यांनी भाषणातून गडकरी व्हिजनरी नेते असल्याचे नमूद केले.
Sudhir Mungantiwar : ज्या गावातील झेडपी विद्यार्थी, त्याच गावातून गणवेश
असा आहे बर्ड पार्क
जामठा क्लोव्हर लीफ येथे नागपूर-हैदराबाद (NH-44) सेक्शनवर जवळपास २० एकर जागेत ऑक्सिजन बर्ड पार्क विकसित करण्यात आला आहे. १४.३२ कोटी रुपयांमध्ये या प्रकल्प नावारुपाला आला आहे. हरित विकासाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. या उद्यानाचे महत्त्व केवळ ऑक्सिजन (प्राणवायू) देणारा परिसर एवढेच नसून पक्ष्यांच्या विविध प्रजातींसाठी एक आश्रयस्थान म्हणून ते उपयुक्त ठरेल. 8,104 प्रकारच्या वनस्पतींसह 11 हेक्टर क्षेत्रफळावर ऑक्सिजन पार्क विकसित करण्यात आला आहे.