Long Discussion : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा अकोला दौरा चर्चेत आला आहे. रविवारी (ता. 12) केंद्रीय मंत्री नितीन गडकरी अकोल्यात दाखल झालेत. अनेक तासापर्यंत गडकरी अकोल्यात मुक्कामी होते. यावेळी त्यांनी भाजप नेते तथा विधान परिषदेचे आमदार वसंत खंडेलवाल यांच्याशी प्रदीर्घ चर्चा केली. अकोल्यातील गांधी रोडवर असलेल्या खंडेलवाल ज्वेलर्स येथे गडकरी पूर्णवेळ मुक्कामी होते. गडकरी आणि आमदार वसंत खंडेलवाल यांच्यात नेमकी कोणती प्रदीर्घ चर्चा झाली हे कळू शकले नाही.
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याचे मतदान सोमवारी पार पडले. मतदानाच्या एक दिवस अगोदर गडकरी अकोल्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले होते. अनेक तासापर्यंत गडकरी आणि वसंत खंडेलवाल यांच्यामध्ये नेमकी कोणती चर्चा सुरू होती, याची उत्सुकता भाजपने नेत्यांनाही लागली आहे. गडकरींचा हा दौरा गोपनीय ठेवण्यात आला होता. आपल्या अकोल्या दौऱ्यादरम्यान ते भाजपच्या काही मोजक्या पदाधिकाऱ्यांना भेटले. त्यानंतर गडकरी पूर्णवेळ गांधी मार्गावरील वसंत खंडेलवाल यांच्या कार्यालयात उपस्थित होते.
Pune Constituency : पुण्यात बोगस मतदान, शिरूरमधील प्रकारामुळे मोठी खळबळ
जुने संबंध
पश्चिम विदर्भातील अनेक नेत्यांशी नितीन गडकरी यांच्या जवळचे संबंध आहेत. यापैकी भाजपचे अनेक आमदार, खासदार नितीन गडकरी यांनाच आपला ‘गॉडफादर’ मानतात. त्यापैकी आमदार वसंत खंडेलवाल हे देखील एक आहेत. कदाचित याच व्यक्तिगत संबंधातून गडकरी खंडेलवाल यांना भेटण्यासाठी आले असावे, असे बोलले जात आहे. परंतु त्यांचा हा दौरा लोकसभा निवडणुकीच्यादरम्यान झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. अशातच महाराष्ट्रात चौथ्या टप्प्याचे मतदान होण्याच्या एक दिवस अगोदर गडकरी यांचा अकोला दौरा झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. गडकरी अकोल्यात असताना भाजपचे स्थानिक नेतेही तेथे नव्हते.
विश्वासू आमदार
पश्चिम विदर्भात नितीन गडकरी यांचे अनेक विश्वासू शिलेदार आहेत. या शिलेदारांमध्ये आमदार वसंत खंडेलवाल यांचाही समावेश आहे. वसंत खंडेलवाल यांची भाजपमधील जडणघडण नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनात झाली आहे. गडकरी यांच्या आशीर्वादामुळेच वसंत खंडेलवाल यांना भाजपने विधानपरिषद निवडणुकीत प्रतिनिधित्वाची संधी दिली. त्यामुळे गडकरींचा अकोला दौरा भविष्यातील राजकीय घडामोडीच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे.