महाराष्ट्र

Nitin Gadkari : ..म्हणून बावनकुळे निवडणूक लढत आहेत!

BJP : गडकरींनी सांगितली हकीकत; टेकचंद सावरकर पूर्ण शक्तीने बावनकुळेंसोबत

Chandrashekhar Bawankule : कामठी मतदारसंघातून टेकचंद सावरकरच लढणार, असे सर्वांना वाटत होते. कारण 2019 मध्ये चंद्रशेखर बावनकुळेंना तिकीट नाकारल्यानंतर त्यांचे कमबॅकही दणक्यात झाले होते. विधान परिषद आणि नंतर पक्षाचे अध्यक्षपद त्यांना देण्यात आले. त्यामुळे आता कामठीतून सावरकर यांनाच संधी मिळेल, अशी दाट शक्यता होती. मात्र भाजपच्या यादीत कामठीपुढे बावनकुळेंचे नाव आले आणि सर्वांनाच आश्चर्य वाटले. या घटनेमागची हकीकत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी मौद्याच्या सभेत सांगितली. 

भाजपच्या पहिल्याच यादीत कामठी मतदारसंघातून चंद्रशेखर बावनकुळे यांचे नाव होते. नाव जाहीर होण्याच्या एक दिवस आधी बावनकुळेंना निवडणूक लढणार आहात का, असे पत्रकारांनी विचारले होते. त्यावर बावनकुळेंनी ‘मी उमेदवारी मागितली नाही. माझ्यावर पक्षाला विजय मिळवून देण्याची जबाबदारी आहे. मी माझे कर्तव्य पार पाडत आहे,’ असे सांगितले होते. मात्र त्यानंतर यादीत त्यांचे नाव आले. हे कसे काय घडले, याबाबत गडकरींनी सांगितले.

शुक्रवारी मौदा येथे बावनकुळेंच्या प्रचारार्थ गडकरींची सभा झाली. त्यावेळी गडकरींनी बावनकुळेंच्या पूर्वीच्या काळात आणि टेकचंद सावरकर यांच्या गेल्या पाच वर्षांच्या काळात मतदारसंघाचा कसा विकास झाला हे सांगितले. त्यावेळी म्हणाले, ‘मला निवडणूक लढायची आहे, असे बावनकुळेंनी स्वतःहून म्हटलेच नव्हते. याबद्दल त्यांनी स्वतःच मला सांगितले. टेकचंद सावरकर यांनाच संधी देण्यात यावी, यासाठी ते आग्रही होते. पण पक्षश्रेष्ठींनी बावनकुळेंना लढण्याचा आदेश दिला आणि त्यांनी तो आदेश पाळला.’ भाजपच्या पक्षसंघटनेचे हेच वैशिष्ट्य आहे आणि हेच आमचे संस्कार आहेत, असे सांगून गडकरींनी बावनकुळेंचे कौतुक केले.

BJP : हे काय नवीनच? वडेट्टीवार मूळचे तेलंगणाचे?

सावरकर नाराज होते पण..

बावनकुळेंना तिकीट जाहीर झाल्यावर टेकचंद सावरकर यांनी नाराजी बोलून दाखवली होती. पण तरीही त्यांनी जाहीरपणे आक्रमक भूमिका घेतली नाही. त्यानंतर ते थेट बावनकुळेंच्या प्रचारातच दिसले. सावरकर यांच्याबद्दल बोलताना गडकरी म्हणाले, ‘ज्यावेळी पक्ष संघटनेने बावनकुळे यांना तिकीट देण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी टेकचंद सावरकर यांनी मोठ्या मनाने हा निर्णय स्वीकारला. आज निवडणुकीत पूर्ण शक्तीने ते बावनकुळे यांच्या पाठिशी उभे आहेत.

error: Content is protected !!