National Politics : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (ता. 9 जून) तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. त्यांच्यासह केंद्रीय मंत्रिमंडळात अनेक खासदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. यात देशात ‘हायवेमॅन’ म्हणून प्रसिद्ध असलेले नितीन गडकरी यांनी हॅट्ट्रिक करत तिसऱ्यांदा केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
मोदी सरकार 3.0 मंत्रिमंडळात नितीन गडकरींचा समावेश असल्याचा फोन रविवारी सकाळीच त्यांना आला. विशेष म्हणजे मोदी सरकारच्या मागील दोन्ही ‘टर्म’मध्ये मंत्री होण्याचा मान नितिन गडकरी यांना मिळाला. तिसऱ्या टर्म मध्येही त्यांच्या नावाचा समावेश आहे. नितिन गडकरी यांनी विजयाची आणि मंत्रिपदाची हॅट्ट्रिक साधली आहे. नितीन गडकरी यांना दळणवळण मंत्रीपदच मिळणार की नवीन जबाबदारी येणार हे अस्पष्ट आहे.
दुसऱ्यांदा नाव विसरले
नितीन गडकरी शपथ घेताना संयमी दिसत होते. पिंक रंगासारखा कुर्ता आणि पायजामा असा त्यांची वेशभूषा होती. गडकरी यांनी हिंदीतून शपथ घेतली. मात्र दुसरी शपथ घेत असताना गडकरी स्वत:चे नाव घेणे अनावधानाने विसरले. गडकरी मोदी यांच्या मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री आहेत. गेल्या सरकारमध्ये सर्वांधिक कामांची नोंद त्यांच्या नावावर आहे. कोविड काळातही गडकरी यांच्या मंत्रालयाने अनेक विक्रम प्रस्थापित केले. गडकरी महाराष्ट्रातील नागपूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. भाजपने ही जागा पक्षाच्या नव्हे तर गडकरींच्या कामाच्या भरोवश्यावर जिंकली.
विक्रमवीर गडकरी
लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार नितीन गडकरी यांनी वियजी हॅट्ट्रिक साधली. त्यांच्या नावावर आणखी एक विक्रम झाला आहे. नागपुरातून सलग तिसऱ्यांदा ते खासदार झाले आहेत. त्यांना 54 टक्क्यांहूनअधिक मते आहेत. इतकी मते घेणारे ते नागपुरातील पहिले उमेदवार आहेत. नागपूर लोकसभा मतदारसंघाच्या इतिहासात आतापर्यंत केवळ सातवेळाच विजयी उमेदवाराला अर्ध्याहून अधिक मते मिळाली आहेत.
गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा भाजपची अन्यथ आघाडी घटली असली तरी मताधिक्याच्या बाबतीत नितीन गडकरी यांनी विक्रम रचला आहे. सलग तीन निवडणुकीत त्यांचे मताधिक्य सव्वा लाखाच्यावर आहे. गेल्या पाच निवडणुकींची आकडेवारी पाहिली तर मुत्तेमवार यांच्या तुलनेत नितीन गडकरी यांना प्रत्येक वेळी चांगले मताधिक्य मिळाल्याचे दिसून आले आहे.