महाराष्ट्र

Reservation :  गडकरी म्हणाले, ‘इंदिरा गांधींना आरक्षण होते का?’

Nitin Gadkari : ‘सर्व पक्षांमधील नेते आता हायकमांडवर उड्या मारतील’

Indira Gandhi : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी त्यांच्या स्पष्ट वक्तेपणासाठी प्रसिद्ध आहेत. बरेचदा त्यांच्या विधानांमुळे ते अडचणीतही येतात. पण त्याची गडकरींना चिंता नसते. आज त्यांनी स्वतःच याबद्दल सांगितले आणि सर्वपक्षीय नेत्यांनाही सल्ला दिला. विशेष म्हणजे महिलांच्या राजकीय आरक्षणावरही त्यांनी भूमिका मांडली. ‘इंदिरा गांधी आरक्षणामुळे पंतप्रधान झाल्या का?,’ असा सवाल त्यांनी केला.

एका वृत्तपत्र समूहाने विदर्भातील विविध पक्षांमधील नेत्यांना एका पुरस्काराने सन्मानित केले. गडकरींच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर माजी गृहमंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री यशोमती ठाकूर यांची उपस्थिती होती. सन्मानित नेत्यांमध्ये भाजप, काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी, दोन्ही शिवसेना यांच्यासह इतरही पक्षांमधील नेत्यांचा समावेश होता. यावेळी आरक्षण या विषयावर गडकरी सावधपणे बोलले. पण त्यांनी आपले स्पष्ट मत मांडलेच.

गडकरी म्हणाले, ‘मी पक्षाचा अध्यक्ष असताना महिलांना आरक्षण देण्याची मागणी केली. मी त्यांना विचारले की इंदिरा गांधींना आरक्षण मिळाले होते का? त्या लोकनेत्या कश्या झाल्या? देशाच्या पंतप्रधान आरक्षणामुळे झाल्या का? वसुंधरा राजे, सुषमा स्वराज यांना आरक्षण मिळाले का? यशोमती ठाकूर यांना आरक्षण आहे का? एक गोष्ट खरी आहे की जात-पात-धर्म-पक्षाच्या पलीकडे लोकांचं प्रेम हेच महत्त्वाचं आहे. कार्य करूनच ते प्रेम मिळू शकतं.’

लोकं फोटो लावतात इकडे तिकडे. याचा फोटो मोठा का, त्याचा छोटा का, यासाठीच पक्षात वाद होतात. हे सगळं निरर्थक आहे. ये पब्लिक है सब जानती है. त्यांना सगळं कळतं. एखाद्या गावात गेले तरी तिथली पोरं देशाचं राजकारण सांगतात. यशस्वी व्हायचं असेल तर जनतेचं प्रेम संपादन करणं, हीच कसोटी आहे, असंही गडकरी म्हणाले.

Nitin Gadkari : शेतकऱ्यांना सांगितली श्रीमंत होण्याची युक्ती

पक्ष तुमच्या घरी आला पाहिजे

उमेदवारी मागण्याचा अधिकार सर्वांना आहे. पण पक्ष आपल्या घरी आला पाहिजे उमेदवारी द्यायला. आपण पक्षाकडे मागणी करण्याची गरज नाही. मी पक्षाचा अध्यक्ष असताना बिहारमध्ये उमेदवारी देताना विलक्षण अनुभव आला. सर्व्हेमध्ये एका नेत्याचे नाव आघाडीवर होते. त्याला उमेदवारी द्यावीच, अशी परिस्थिती होती. पण तेथील इतर नेते माझ्याकडे आले. त्यांनी सांगितले की 9 खून केलेल्या माणसाला तुम्ही उमेदवारी देताय. मी त्या नेत्याला बोलावून घेतले. तर तो म्हणाला, ‘साहेब आता मी सगळं सोडलं आहे.’ वाल्याचा वाल्मिकी होऊ शकतो, तर ज्या माणसाने एकदा चूक केली तो ती सुधारू शकत नाही का? असा सवाल मी तेथील इतर नेत्यांना केला.

कॉम्प्रमाईज करू नका!

कॉम्प्रमाईज करू नका, काहीही फरक पडत नाही. आपल्या हिशेबाने चालायचे. मतदान करणाऱ्याचे आणि न करणाऱ्याचेही भले. लग्नाच्या आहेराप्रमाणे निवडणुकीत मालपाणी पोहोचतो. पण लोक हुशार आहेत. ते एकाचा माल खातात आणि दुसऱ्याला मतदान करतात. त्यामुळे स्वतःच्या मार्गाने चालत राहा. लोक तुमच्या सोबत येतील, असा सल्ला गडकरींनी सर्वपक्षीय नेत्यांना दिला.

आज पुरस्कार उद्या तिकीट!

आज आपण ज्या नेत्यांचा सत्कार करत आहात त्यातील अनेक लोक इच्छुक उमेदवार आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी ते नशीब आजमावण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे आज इकडे पुरस्कार मिळाला की उद्या तिकडे हायकमांडकडे उमेदवारी मागण्यासाठी उड्या मारायला मोकळे, असा टोलाही गडकरींनी लगावला.

कोण कोणत्या पक्षात?

यावेळी अनिल देशमुख यांनीही टोलेबाजी केली. भाषण करताना त्यांनी वृत्तपत्र समूहाला महत्त्वाची सूचना केली. ते म्हणाले, ‘आज तुम्ही ज्यांचा सन्मान करीत आहात, त्यांच्या पक्षांचा उल्लेख करू नका. कारण निवडणुका आल्या की दोन महिन्यांना कोण कोणत्या पक्षात आहे, हे स्पष्ट होईल.’

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!