महाराष्ट्र

Lok Sabha Election : जातीच्या नव्हे विकासाच्या आधारावर मतदान करा

Chandrapur Constituency : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आवाहन

Nitin Gadkari : कोणत्याही मतदारसंघाचा विकास हा धर्माच्या किंवा जातीच्या आधारावर होऊ शकत नाही. त्यामुळे चंद्रपुरातील मतदारांनी खासदार निवडताना विकासाचा दृष्टिकोन डोळ्यापुढे ठेवावा, असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथे शिवाजी महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. गडकरी यांनी या सभेत सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या विकास कामांचा पाढा वाचला.

सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यात मंत्री असताना चंद्रपूर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास केला आहे. अशात मुनगंटीवार खासदार होऊन दिल्लीत गेल्यास ती केंद्र व राज्य सरकारचा निधी एकत्रितपणे खेचून आणू शकतील, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला. मोदी सरकार देशाचा कायापालट करण्यासाठी कार्य करीत आहे. अशात काही लोक जाती, धर्माच्या आधारावर लोकांना मतदान करण्याचे आवाहन करीत आहेत. जात किंवा धर्माच्या आधारावर निवडणूक जिंकता येऊ शकत नाही, असे गडकरी म्हणाले.

चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक वायू, कोळसा आणि खनिज संपत्ती आहे. बांबू पासून विविध वस्तू तयार करणारे केंद्र चंद्रपूर जिल्ह्यात आहे. या सर्व नैसर्गिक साधनांपासून जैवइंधन तयार करता येऊ शकते. या इंधन विक्रीतून चंद्रपुरातील शेतकरी समृद्ध व सुखी होईल, असे गडकरी म्हणाले. राजुरा परिसरात विमानतळ उभारण्यासाठी आवश्यक ती मदत करू. परंतु येथे विमानतळ तयार झाल्यानंतर त्यात लागणारे जैवइंधन चंद्रपुरातील शेतकऱ्यांनी तयार केलेलेच असावे, अशी अपेक्षाही गडकरी यांनी व्यक्त केली.

विकासाबाबत बोला

यावेळी बोलताना महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, राज्यात अनेक महिने महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर होते. खासदार आणि आमदारही महाविकास आघाडीचे होते. सत्ता असताना या नेत्यांनी चंद्रपूर जिल्ह्यात केलेल्या 22 मोठ्या विकास कामांची यादी जरी जाहीर केली तरी, पुरेसे आहे. जातपात, धर्म, पंथ यावर आधारित प्रचार विरोधकांकडून केला जात आहे. त्यापेक्षा चंद्रपूर जिल्ह्याचा किती विकास केला याचे पुरावे सादर करीत मतदारांपुढे विरोधकांनी यावे, असे आव्हान मुनगंटीवार यांनी यावेळी दिले.

Lok Sabha Election : काँग्रेस म्हणजे कालबाह्य झालेले औषध, केवळ फेकायच्या कामाचे !

गेल्या अनेक वर्षांपासून आपण महाराष्ट्राच्या राजकारणात कार्यरत आहोत. महाराष्ट्राचे अर्थमंत्री म्हणूनही आपण कार्य केले. अशात महाराष्ट्राच्या तिजोरीचा पासवर्ड आजही आपल्याला ठाऊक आहे. लोकसभेत चंद्रपूरचा खासदार म्हणून निवडून गेल्यास राज्य आणि केंद्र या दोन्ही सरकारकडून निधी खेचून आणण्याची ताकद आपल्यात असल्याचे मुनगंटीवार म्हणाले. महाराष्ट्रात मंत्री म्हणून काम करताना नितीन गडकरी यांचे सहकार्य सदैव आपल्याला लाभले. भविष्यातही चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी गडकरींचे सहकार्य लाभेल, असा विश्वास मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!