Post Upgradation : शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर गुवाहाटीला जाऊन परत येणारे आमदार नितीन देशमुख यांना बढती मिळाली आहे. नितीन देशमुख आता शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उपनेते झाले आहेत. पश्चिम विदर्भातील शिवसेनेचा एखादा आमदार उपनेता झाल्याची ही अलीकडच्या काळातील पहिलीच नियुक्ती आहे. उद्धव ठाकरे यांनी नितीन देशमुख यांना हे पद दिले आहे.
महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर असताना शिवसेनेमध्ये फूट पडली होती. एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदार आणि मंत्री गुवाहाटीला निघून गेले होते. या आमदारांमध्ये बाळापूर विधानसभेचे नितीन देशमुख यांचा देखील समावेश होता. त्यावेळी नितीन देशमुख गुवाहाटीमधून निघून आले होते. महाराष्ट्रामध्ये परतल्यानंतर देशमुख यांनी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीवर गंभीर आरोप केले होते.
मारण्याचा प्रयत्न
महाराष्ट्रामध्ये परतल्यानंतर आमदार नितीन देशमुख यांनी षडयंत्र रचण्यात आल्याचं नमूद केलं होतं. आपल्याला एक इंजेक्शन देण्यात आलं होतं. आपल्याला मारण्याचा प्रयत्न यावेळी झाला. मात्र एकनाथ शिंदे आणि भाजपच्या नेत्यांनी आपल्याला हृदयविकाराचा झटका आल्याचे जगजाहीर केले. हा प्रकार खोटा होता. आपल्याला जीवे मारण्यासाठी डांबून ठेवण्यात आले होते.
शिवसेनेतील बहुतांश नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत निघून गेले. भारतीय जनता पार्टीसोबत त्यांनी राज्यात महायुतीचे सरकार स्थापन केले. मात्र त्यानंतरही आमदार नितीन देशमुख उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहिले. लोकसभा निवडणुकीमध्ये आमदार नितीन देशमुख यांनी महाविकास आघाडीसाठी प्रचंड मेहनत केली. देशमुख यांच्यासह अकोला जिल्ह्यातील सगळ्यात शिवसैनिकांनी काँग्रेसचे उमेदवार डॉ. अभय पाटील यांच्यासाठी काम केले.
Vijay Wadettiwar : दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या छातीला बॅज लावावे !
विधानसभा निवडणुकीतही नितीन देशमुख आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रचंड जोर लावला. बाळापूर विधानसभा मतदारसंघातून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने बळीराम सिरस्कार यांना उमेदवारी दिली होती. वंचित बहुजन आघाडीकडून नतिकोद्दीन खतीब यांना संधी दिली होती. मात्र या सगळ्यांचा पराभव करत नितीन देशमुख यांनी विजय मिळवला. अकोला जिल्ह्यात भाजपला कोंडीत पकडण्यासाठी नितीन देशमुख आणि त्यांचे सहकारी सातत्याने आंदोलन करीत होते.
परिश्रमाचे फळ
शेतकऱ्यांच्या पीकविमा मुद्द्यावर नितीन देशमुख यांनी आक्रमक आंदोलन केलं. गोपाल दातकर यांच्यासह उपोषणालाही ते बसले. अकोल्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील अनेक महिन्यांपासून गायब होते. स्वातंत्र्यदिनाच्या शासकीय ध्वजारोहण समारोहाला देखील त्यांनी दांडी मारली. त्यामुळे नितीन देशमुख यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर लगेचच विखे पाटील यांना अकोल्यात यावे लागले होते. आतापर्यंत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी घेतलेल्या सगळ्या परिश्रमाचं फळ म्हणून आमदार नितीन देशमुख यांना उपनेता पद बहाल करण्यात आलं आहे.