उल्हासनगरमध्ये हिंदू मुलीच्या मुस्लिम धर्मांतर विरोधात हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात आमदार नितेश राणे सहभागी झाले होते. मोर्चापूर्वी त्यांनी धर्मांतर झालेल्या मुलीच्या कुटुंबीयांचीही भेट घेत त्यांची कहाणी ऐकली. या मुलीच्या कुटुंबीयांना पोलिसांनी वेळीच सहकार्य न केल्याचा आरोप नितेश राणे यांनी केला. यानंतर उल्हासनगरच्या तहसीलदार कार्यालयापर्यंत हा हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी नितेश राणे यांच्या एका प्रक्षोभक घोषणेने वाद निर्माण झाला आहे.
“मी आज एक आमदार म्हणून नाही, तर हिंदू म्हणून तुम्हाला ताकद देण्यासाठी आलोय. आपण फक्त घोषणा देत बसायचं का? जेव्हा एखादी घटना घडते, तेव्हा कुणीच पुढे येऊन बोलत नाही. आम्ही काही करणार नाही, फक्त मोर्चे काढत बसणार. तुमच्या उल्हास नगरमध्ये आज काय चालले आहे, हे काय तुम्हाला माहित नाही,” असं भाजपा आमदार नितेश राणे म्हणाले. “सलीम अन्सारी, बाबा अन्सारी हा आज जिवंत का आहेत? मी आज त्या पीडित कुटुंबाची भेट घेतली. त्या कुटुंबाची व्यथा मी ऐकली. मुलीच्या कुटुंबाला तिचे वडील भेटायला गेले तर पोलीस सांगतात तुम्हाला भेटता येणार नाही. पोलिसांना मी सांगेन हे सरकार कुणाचे आहे? गृह मंत्री कुणाचे आहेत?” असा सवाल नितेश राणे यांनी केला. तर जोपर्यंत यांच्या घरात लव्ह जिहाद होत नाही तोपर्यंत त्यांना झळ बसणार नाही, असे म्हणत भाजपा आमदार नितेश राणे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्यावर नाव न घेता टीका केली.
“पोलिसांना मी सांगेन, तुम्हाला जमत नाही तर एक दिवसाची सुट्टी घ्या आणि हिंदूंच्या हातात द्या. हे लोक त्या मुलीच्या घरी आले आणि त्यांनी तिच्या घरातील मंदिर जाळून टाकले. आज हिंदू म्हणून आपण जागृत राहिलो नाही तर तुम्ही पूजा देखील करू शकणार नाही,” असं नितेश राणे म्हणाले.
“आज हिदू संघटित झाले, त्यामुळे पोलिस फोर्स लावावा लागला. तुम्ही तीन चार तास एकत्र आलात तर या पोलिसांची हवा टाईट झाली” असं राणे म्हणाले.