NCP : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडले. संपूर्ण 288 मतदारसंघांमध्ये मतदान पार पडले. पण काही ठिकाणी अनपेक्षित घटनाही घडल्या आहेत. कुठे दोन पक्षांचे उमेदवार समोरासमोर आलेत. कुठे लोकप्रतिनिधींची पोलिसांसोबत बाचाबाची झाली आहे. वर्ध्यात शरद पवार गटाचे नितेश कराळे मास्तरांना मारहाण झाल्याचा प्रकार समोर आला आहे. नितेश कराळे यांना भाजप कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे मारहाणीचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. या व्हिडीओत नितेश कराळे यांना बेदम मारहाण केली जात असल्याचं स्पष्ट दिसते.
नितेश कराळे यांनी या घटनेवर सांगितलं की, आपण आपल्या गावाहून मतदान करुन परत येत होतो. त्यावेळी वर्धा मतदारसंघात फिरण्यासाठी निघालो. संपूर्ण कुटुंबही सोबत होतं. उंबरी गावातील एका बुथवर थांबलो. उंबरी गावातून आपलं रोजचं जाणेयेणं आहे. आपल्या मार्गात हे गाव येतं. त्यामुळे आपण उंबरी गावातील बुथवर थांबलो. तिथल्या लोकांची विचारपूस केली. त्याआधी एक पोलिस गाडी त्याठिकाणी येऊन गेली. आमदार पंकज भोयर यांचा बुथ तेथे होता. तिथे पंकज भोयर यांचे आठ लोकं बसून होते. बाकावर ग्रामपंचायतीचे कर्मचारी देखील लॅपटॉप घेऊन बसले होते, असं निलेश कराळे यांनी सांगितलं.
जाब विचारल्यानं मारहाण
आपण यासंदर्भात जाब विचारल्यानंतर मारहाणा सुरुवात करण्यात आल्याचं कराळे मास्तर यांनी सांगितलं. या हल्ल्यात आपल्या लहान मुलीलाही लागल्याचा आरोप त्यांनी केला आहे. नितेश कराळे हे कराळे मास्तर म्हणून ओळखले जातात. पुण्यात जाऊन त्यांनी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास केला. त्यात यश न आल्यानं त्यांनी स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन करणारे क्लासेस सुरू केले. पुणेरी पॅटर्न असं त्या क्लासचं नाव होते. मात्र कराळे यांवी खास वऱ्हाडी भाषा पुणेरी पॅटर्नसोबत जुळली नाही. त्यामुळं त्यांनी वऱ्हाडीतूनच शिक्षण देणं सुरू केलं.
क्लासेसच्या माध्यमातून प्रसिद्ध झालेले कराळे मास्तर राजकारणातही उतरले. त्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल झालेत. त्यांच्या सर्वच व्हिडीओंना मोठ्या प्रमाणावर व्ह्यू मिळतात. अलीकडच्या काळात कराळे मास्तरांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचं काम सुरू केलं होतं. सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात ते बोलतात. महागाई आणि बेरोजगारीबाबत आवाज उठवतात. यासंबंधित त्यांचे व्हिडीओ सोशल मीडियामध्ये व्हायरल आहेत. राष्ट्रवादी काँगेस शरद पवार गटाच्या माध्यमातून त्यांनी लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छाही व्यक्त केली होती. पण त्यांना निवडणुकीची उमेदवारी मिळाली नाही. कराळे मास्तरांनी विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार केला.