Anup Dhotre : अकोलेकरांसाठी केंद्र सरकारने आणखी एक सुविधा उपलब्ध करून दिली आहे. खासदार अनुप धोत्रे यांनी केलेल्या पाठपुराव्याला केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यानुसार दोन गाड्यांना अकोला अकोला जिल्ह्यात थांबा देण्यात आला आहे. मध्य रेल्वेच्या नागपूर-भुसावळ मार्गावर या गाड्या धावतात. या दोन्ही गाड्यांना थांबा देण्यात यावा, अशी मागणी धोत्रे यांनी केली होती. त्यानुसार रेल्वे मंत्री वैष्णव यांनी अकोल्यातील दोन गावांना दसऱ्याचं खास गिफ्ट दिलं आहे. ही गावे आहे मूर्तिजापूर आणि बोरगाव मंजू.
अकोला जिल्ह्यातून धावणाऱ्या दोन रेल्वे गाड्यांना मूर्तिजापूर आणि बोरगाव मंजू येथे थांबा देण्यात यावा, अशी मागणी होत होती. यासंदर्भात भाजपचे खासदार अनुप धोत्रे यांनी पाठपुरावा सुरू केला. त्यांनी अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. रेल्वे प्रवाशांची सुविधा पाहता पुणे-नागपूर-पुणे एक्स्प्रेसला मूर्तिजापूर येथे थांबा देण्यात आला आहे. तर बडनेरा येथुन नाशिकला जाणाऱ्या खास गाडीला बोरगाव मंजू येथे थांबा देण्यात आला आहे. भारतीय रेल्वे बोर्डाचे उप निदेशक राजेश कुमार यांनी यासंदर्भातील आदेश काढले आहेत.
मोठा फायदा
नागपूर येथुन पुण्याला जाणारी नागपूर-पुणे सुपरफास्ट एक्स्प्रेस रात्री 09.24 वाजता मूर्तिजापूर येथुन जाते. मात्र आतापर्यंत या गाडीला येथे थांबा नव्हता. त्यामुळे मूर्तिजापूर येथुन पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांना अकोला किंवा बडनेरा या दोनपैकी एका स्थानकावर जावे लागत होते. मध्य रेल्वेच्या नागपूर-भुसावळ मार्गावर मूर्तिजापूर हे महत्वाचे स्थानक आहे. त्यामुळे या गाडीला नागपूरवरून येताना व जाताना दोन्ही वेळा मूर्तिजापुरात थांबा देण्यात यावा अशी मागणी होत होती. आता प्रवशांची ही मागणी पूर्ण झाली आहे.
बडनेरा येथुन नाशिकला जाणारी गाडी सकाळी अकराच्या सुमारास निघते. ही गाडी अकोला येथे दुपारी 12 वाजता पोहोचते. दुपारी पावणे बाराच्या सुमारास ही गाडी बोरगाव मंजू येथुन जाते. या गाडीला बोरगाव मंजू येथे थांबा मिळाल्याचे सकाळच्या सुमारास बोरगाव येथुन अकोल्याकडे प्रवास करणारे विद्यार्थी, रुग्ण, शेतकरी यांची सुविधा होणार आहे. परतीच्या प्रवासात ही गाडी पहाटे तीनच्या सुमाारास बोरगावात येते. त्यामुळे नाशिकहून लांबचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बोरगाव येथे उतरता येणार आहे. या दोनही गाड्यांना तातडीने थांबा देण्यता यावा, असेही रेल्वे बोर्डाच्या आदेशात नमूद आहे.