Assembly Election : अगदी काही दिवसांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून जोरदार प्रचार सुरू झाला आहे. लोकसभा निवडणुकीत बऱ्यापैकी यश मिळाल्यानंतर महाविकास आघाडीचे ‘हौसले बुलंद’ आहेत. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचं प्रचारगित लाँच करण्यात आलं आहे. पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या ट्विटर हॅन्डवरून गुरुवारी (17 ऑक्टोबर) सकाळी आठव्या सुमारास या प्रचार गिताचं लाँचिंग केलं. ‘शरद पवार पुन्हा…!’ हे या गिताचे मुख्य आकर्षक बोल आहेत. या गितामध्ये मोठ्या प्रमाणावर तुतारी वाजविणाऱ्या लोकांना दाखविण्यात आलं आहे.
प्रचारगित लाँच करताना खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या भावनाही ट्विटरवर व्यक्त केल्या आहेत. प्रत्येकाच्या मनात हे गित ऊर्जा निर्माण करेल असं त्यांनी नमूद केलं आहे. खासदार सुप्रिया सुळे, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार अनिल देशमुख, जयंत पाटील, अमोल कोल्हे, आमदार रोहित पवार यांना या गितात ठळकपणे दाखविण्यात आलं आहे. सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे पवारांनी भर पावसात भाषण केलं होतं. पवारांचं हे भाषण महाराष्ट्राच्या इतिहासात ‘गेमचेंजर’ ठरलं होतं. भाषणाचा हा क्षण पुन्हा एकदा या प्रचार गितात ठळकपणे दाखविण्यात आला आहे. त्यातून आजही पवार सक्षम असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसनं केला आहे.
पुन्हा संविधान
प्रचारगितामध्ये संविधान आणि संविधानासाठी एकत्र या असा उल्लेख मध्ये मध्ये करण्यात आला आहे. त्यावरून लोकसभा निवडणुकीत संविधान धोक्यात असल्याचा जो प्रचार करण्यात आला, तो विधानसभा निवडणुकीतही कायम राहणार असल्याचं एकप्रकारे अधोरेखित करण्यात आलं आहे. गेल्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने हक्क मागतोय महाराष्ट्र हे गाणं आणलं होतं. सरकारविरोधी भूमिका दर्शवणारं हे प्रचारगीत आणि जाहिरात गीत होतं. त्या गाण्यात रॅप आणि लोकसंगीताचं फ्युजन करण्यात आलं होतं.
यंदाच्या गितात जास्तीत जास्त पारंपरिक संगिताचा वापर करण्यात आला आहे. गितात राष्ट्रवादीचे नेते लोकांसाठी असे राबत आहेत, हे दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यंदाच्या गितात विरोधकांनी टीका टीप्पणी करण्यापेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस कशी सरस आहे, हे दिसले पाहिजे याची पूर्ण काळजी घेण्यात आल्याचं दिसत आहे. सुप्रिया सुळे यांनी ट्विट केल्यानंतर हे गीत पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचविण्यात आलं आहे. गितासोबत काही सूचनाही कार्यकर्त्यांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे ताईंकडून लाँच झालेलं हे प्रचारगित यंदाच्या निवडणुकीत कोणती कमाल दाखविणार, हे पाहण्यासारखे ठरणार आहे.