Maharashtra Government : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण राजकोट येथे केवळ सहा फुटाचा पुतळा उभारण्याची परवानगी देण्यात आली होती. राज्य सरकारच्या कला विभागाचे संचालक राजीव मिश्रा यांनी ही माहिती दिली आहे. मिश्रा यांच्या या विधानानंतर महाराष्ट्रातील राजकारणात नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत. सिंधुदुर्गातील मालवण समुद्रकिनारी राजकोट किल्ला आहे. या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते 4 डिसेंबर 2023 रोजी या पुतळ्याचे लोकार्पण करण्यात आले.
नौदल दिनाचे औचित्य साधत या पुतळ्याचे लोकार्पण करण्यात आले होते. मात्र आठ महिन्यातच पुतळा कोसळला. त्यामुळे आता राजकारण तापले आहे. या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. विरोधकांनी या घटनेचे राजकारण केले असल्याचा मुद्दा सत्ताधाऱ्यांनी मांडला आहे. यावर कला संचालक मिश्रा यांनी केलेल्या विधानामुळे नवा वाद निर्माण होणार आहे. राज्यात कुठेही महापुरूषांचा पुतळा उभारायचा असल्यास कला संचलनालयाची परवानगी घ्यावी लागते. परवानगी नसेल तर पुतळा उभारता येत नाही.
नियमबाह्य काम?
कोणत्याही एजन्सीला कला संचालनालयाकडे पुतळा उभारण्याची परवानगी मागावी लागते. परवानगी मागताना संबंधित पुतळ्याचे मातीपासून तयार केलेली प्रतिकृती सादर करावी लागते. मालवण राजकोट येथील पुतळ्याच्या परवानगीसाठी सहा फुटाचे मॉडेल सादर केले होते. त्यानुसार सहा फुटाच्या पुतळ्याची परवानगी देण्यात आली. कला संचलनालयाच्या समितीनेच सहा फुटाच्या पुतळ्याला सहमती दर्शविली. पुतळ्याच्य चेहऱ्यावरील हावभाव, रचना आदी गोष्टी यावेळी बारकाईने तपासण्यात आल्या. मात्र प्रत्यक्षात छत्रपती शिवाजी महाराजांच्या 35 फुटांच्या (चबुतऱ्यासह) पुतळ्याचे लोकर्पण करण्यात आले.
मालवणच्या घटनेमध्ये केवळ सहा फुटांच्या क्ले मॉडेलला मान्यता देण्यता आली. नौदलास याबाबत कळविण्यात आले होते. त्यानंतर हा पुतळा ३५ फुटांचा केला जाणार आहे, याबाबत नौदलाने कोणतीही माहिती दिली नाही. पुतळ्याच्या स्ट्रक्चरमध्ये स्टेनलेस स्टिलचा वापर होणार आहे, हे देखील नमूद नव्हते. पुतळ्याच्या चबुतऱ्यासाठीही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य वास्तुविशारदाकडून घ्यावी लागते. दोन्ही परवानगी मिळाल्यानंतर शिल्पकाराला परवानगीचे तसे पत्र दिले जाते. सहा फुटावरून पुतळ्याची उंची 35 फुट होत असेल तर शिल्पकाराने त्यासंबंधी अभ्यास करायला हवा होता. उंच पुतळा उभारण्यासाठी स्ट्रक्चरल इंजिनिअरची मदत घ्यावी लागते. संबंधित परिसरात पुतळा उभारताना कोणती काळजी घ्यायला हवी, पुतळा उभा करताना कोणती तांत्रिक काळजी घ्यावी, याचा अभ्यास न केल्यामुळे कदाचित ही पुतळा कोसळला असावा, असे मिश्रा यांनी सांगितले.