Review Meeting At Mumbai : अतिक्रमणाच्या विळख्यातून मुक्त झालेले छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले, आग्रा येथे महाराजांना मिळालेला सन्मान, शासकीय निधीतून शिवराज्याभिषेक सोहळा, शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघनखं, भारत-पाक सिमेवर महाराजांचा अश्वारूढ पुतळा अशी शिवसेना केल्यानंतर सांस्कृतिक कार्य विभाग राज्याच्या इतिहासात आणखी एक मैलाचा दगड रोवणार आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्राचे नवे सांस्कृतिक धोरण आता तयार झाले आहे. लवकरच त्याला कॅबिनेट मंत्रिमंडळाची मान्यता मिळण्याचे संकेत आहेत.
मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात मुनगंटीवार यांनी शुक्रवारी (ता. 2) सांस्कृतिक धोरणासंदर्भात आढावा बैठक घेतली. नव्या सांस्कृतिक धोरणात मराठमोळी संस्कृती, पर्यटन, कारागिरी, गडकिल्ल्यांचे संवर्धन, लोककला, नृत्य, संगीत यांना प्रोत्साहन यांचा समावेश राहणार आहे. सांस्कृतिक धोरण 2010 पुनर्विलोकन समितीने दिलेल्या अहवालाच्या अनुषंगाने मुनगंटीवार यांनी बैठकीत सर्वसमावेश मुद्द्यांवर चर्चा केली. समितीचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे, सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, उपसचिव नंदा राऊत, सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे, पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयाचे संचालक सुतित उगले आदी यावेळी उपस्थित होते.
संस्कृतीची ओळख होणार
महाराष्ट्रातील सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी व तो वृद्धींगत करण्याला नव्या धोरणात भरपूर वाव असणार आहे. सांस्कृतिक धोरण बहुआयामी असेल. महाराष्ट्राची संस्कृती त्यातून जगाला कळणार आहे. समितीने दिलेला अहवाल आणि त्यातील शिफारशींचा सकारात्मक विचार होणार आहे. त्यातून सांस्कृतिक धोरण जाहीर होईल. राज्यातील गडकिल्ल्यांना यातून मोठा फायदा होईल. कारागिरीला नवसंजीवनी मिळेल. पुरातन वास्तुंचे वैभव वाढेल. मराठी भाषेतील साहित्य, ग्रंथव्यवहार आणि वाचनसंस्कृती वाढीस लागेल. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आजही अनेक लोककला आहेत. त्यात भारूड, गोंधळ आदींचा समावेश आहे. त्यांनाही या धोरणातून चालना मिळणार आहे.
राज्याला मोठा आध्यात्मिक वारसा आहे. त्यामुळे भक्ती आणि संस्कृतीचा मेळ बसविण्यात येणार आहे. जगाला महाराष्ट्राने बहुमूल्य असे संगीत, नृत्य, रंगभूमी, चित्रपट, दृश्यकला दिली आहे. त्यांनाही या धोरणातून प्रोत्साहन मिळेल, असा विश्वास सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. राज्यात लोक संस्कृती आहेत. त्यांचे खास पेहराव आहे. वेगवेगळी खाद्यसंस्कृती महाराष्ट्रात आहे. आभुषणांचीही आगळीवेगळी पद्धत आहे. प्रदेशनिहाय भाषेचा लहेजा बदलतो. कोकणात कोंकणी बोलली जाते. विदर्भात वऱ्हाडी. पूर्व विदर्भात झाडीबोली. जळगाव आदी भागात खानदेशी. या भाषेवरही धोरणात विचार होणार आहे. ती जपली जाणार आहे. त्वावर काय करता येईल याचाही विचार केला जाणार असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले.
CM Eknath Shinde : मुख्यमंत्री म्हणाले, सुधीरभाऊ आमचे सर्वात सक्रिय मंत्री
समितीचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांनीही माहिती दिली. सांस्कृतिक धोरणात सर्वसमावेशकतेचा आग्रह धरण्यात आला आहे. समितीच्या एकूण 18 बैठकी घेण्यात आल्या. विविध विषयांच्या अनुषंगाने नेमलेल्या उपसमितीच्या 108 बैठकी झाल्या. समितीकडे एकूण 137 व्यक्ती आणि 43 संस्था, संघटनांनी निवेदने सादर केले, असे ते म्हणाजले. सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव खारगे यांनी राज्याच्या सांस्कृतिक धोरणाचा मसुदा मंत्रिमंडळासमोर ठेवला जाईल. धोरणातील शिफारशींच्या अनुषंगाने इतर शासकीय विभागांशी निगडीत बाबींसंदर्भात त्यांची मते जाणून घेण्यात येतील, असे सांगितले.