कंगना रणौत यांच्या पाचवीला वाद पुजला आहे’ असे म्हटले जाते. त्या खासदार झाल्यानंतरही हा वाद पिछा सोडायला तयार नाही. याला कारणीभूत त्या स्वतःच आहे. आता तिने आणखी एका कारणाने विरोधकांना संधी दिली आहे. ‘मला भेटायचं असेल तर आधार कार्ड सोबत घेऊन या’ असं फर्मान सोडून कंगना पुन्हा चर्चेत आल्या आहे.
‘माझ्या मतदार संघातल्या जनतेला मला भेटायचं असेल तर, त्यांनी आधार कार्ड घेऊन यावं,’ असं फर्मान हिमाचल प्रदेशच्या मंडी मतदारसंघाच्या खासदार कंगना रणौत यांनी काढलं आहे. त्यामुळं आता विरोधकांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. भाजपच्या खासदार कंगना रणौत यांनी काल एक पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी मंडी मतदार संघातल्या जनतेला काही सूचना केल्या. ‘माझं एकच लक्ष्य आहे की, माझ्या जनतेनं माझ्याशी जोडलं गेलं पाहिजे. त्यांनी फक्त काम करून घेण्यासाठी येऊ नये. ज्यांना जनसेवा करायची इच्छा आहे, जे राजकारणात येण्यासाठी उत्सुक आहेत, त्यांच्याशी मी वरचेवर नक्की भेटेन. माझ्याशी चर्चा करायची असेल तर नक्की या, मात्र येताना आधार कार्ड घेऊन या,’ असं त्यांनी म्हटलं आहे.
कंगना रणौत यांनी काय म्हटलं?
“हिमाचल प्रदेशच्या मंडी मतदारसंघात माझं कार्यालय आहे. प्रत्येकाने आपल्या समस्या किंवा तक्रारी कागदावर लिहून ठेवल्यास त्या ऐकणं आणि समजून घेणं सोपं होईल. अनेकवेळा पर्यटक भेटायला येतात आणि सर्वसामान्यांची गैरसोय होते. त्यामुळे मंडी मतदारसंघ क्षेत्रातील आधार कार्ड बरोबर घेऊन यावं. तसेच तुमचं जे काम असेल ते एका कागदावर लिहून आणा,’ असं कंगना रणौत यांनी म्हटलं आहे.
विरोधकांनी साधला निशाणा
काँग्रेस नेते विक्रमादित्य सिंग यांनी कंगना रणौत यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, “लोकप्रतिनिधीला कुणीही भेटू शकतो. कारण लोकांच्या समस्या दूर करणं ही जबाबदारी लोकप्रतिनिधीची असते. त्यामध्ये सर्व समाजातील लोकांना भेटणं त्यांची कामे करणं ही त्यांची जबाबदारी आहे. मात्र, त्यांना भेटण्यासाठी आधार कार्ड बरोबर आणावं असं सांगण्याची गरज नाही”, अशी टीका काँग्रेसचे नेते विक्रमादित्य सिंग यांनी केली.
कॉन्स्टेबलने लगावली होती कानशिलात
अभिनेत्री खासदार कंगना रणौत यांना चंदीगढ विमानतळावर काही दिवसांपूर्वी एका अपमानजनक प्रसंगाला सामोरं जावं लागलं होतं. एका सीआयएसफच्या महिला कॉन्स्टेबलने त्यांच्या कानशिलात लगावली होती. या घटनेची चांगलीच चर्चा झाली होती. कंगना रणौत यांना कानशिलात लगावल्याची घटना घडली, यामुळे मोठी खळबळ उडाली होती.