Buldhana constituency : शुक्रवारी बुलढाणा लोकसभा मतदारसंघात सुमारे पावणे सात लाख मतदार मतदानासाठी आले नाहीत. जिल्ह्याची मतदानाची टक्केवारी 62.02 टक्के आहे. तथापि, शहरी मतदारांची टक्केवारी लक्षणीय कमी होती. जिल्हा प्रशासनाकडून मतदानात सहभाग वाढवण्यासाठी जोरदार प्रयत्न करूनही मतदान कमी झाल्यामुळे निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची निराशा झाली. मात्र,मतदान न करणाऱ्यांवर ‘शेम ऑन यू’ म्हणण्याची वेळ आली आहे.
यंदा आयोगाच्या मार्गदर्शनात जिल्हा प्रशासन व निवडणूक विभागाने दोन महिन्यापासून विविध उपक्रम राबविले. यातून मतदारसंघाच्या कानाकोपऱ्यात मतदान जागृती करण्यात आली. यात स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटना यांनीही हातभार लावला. यामुळे जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी यंदा 70 टक्के मतदानाची शक्यता वर्तविली होती. ‘अबकी बार 70 टक्के पार’ असा नारा यावेळी बुलंद करण्यात आला होता. निवडणूक रिंगणात 21 उमेदवार होते.
महायुतीचे प्रतापराव जाधव यांनी झंझावती प्रचार करून मोठ्या संख्येने प्रचारसभा लावल्या. महाविकास आघाडीचे उमेदवार नरेंद्र खेडेकर यांच्यासह अपक्ष रविकांत तुपकर, संदीप शेळके या उमेदवारांनीही ‘रोड शो’, प्रचारफेऱ्या काढून वातावरण निर्मिती केली. मतदारसंघात हजारो प्रचाररथ, ध्वनिवर्धक, फलक, याद्वारे प्रचार करण्यात आला. समाजमाध्यमे तर निवडणुकांनी व्यापून गेल्याचे दिसून आले.
मतदान अधिकाऱ्यांच्या मते, शहरातील मतदान केंद्रांवर लोक न येण्यामागे कडक उन्हाळा हे एक कारण असल्याचे सांगितले जात आहे. निवडणूक आयोगाने मतदारसंघातील या निवडणुकीत मतदान वाढवण्यासाठी अनेक उपक्रम राबवले लोकांना विविध ॲप्स वापरण्यास प्रोत्साहित करण्यापासून ते मतदान केंद्र शोधण्यासाठी व्होटर स्लिपवर QR कोड टाकण्यापर्यंत. मतदार हेल्पलाइन, ‘तुमच्या उमेदवाराला जाणून घ्या’ आणि एक विस्तृत बूथ निवडणूक व्यवस्थापन योजना हे इतर उपायांपैकी एक होते. मात्र याचा कुठलाही फरक पडलेला नाही. यामध्ये 6 लाख 76 हजार 939 मतदारांनी पवित्र हक्क बजावण्याचे टाळले.
बुलढाणा लोकसभेच्या रिंगणात युती, आघाडी, दोन तगडे अपक्ष असे पर्याय होते. अपक्षांची भरमार होती. खासदारांविरुद्ध काहीसा रोष असला तरी मतदारांना अन्य पर्यायही होते. याउप्परही सगळ्यांना नापसंत करून रोष व्यक्त करायचा तर ‘नोटा’च्या रुपाने बाविसावा पर्याय देखील होता. असे असतानाही 6 लाख 76 हजार 939 मतदारांनी पवित्र हक्क बजावण्याचे टाळणे, ही धक्कादायक बाबच ठरावी.
या मतदारसंघात एकूण मतदारांची संख्या 17,82,700 इतकी आहे. यामध्ये 2014 मध्ये 61 टक्के व 2019 मध्ये 63 टक्के मतदान झाले होते. असे असताना यंदा उन्हाळा आणि लग्नसराई पाहता ही टक्केवारी कायम राहिल असा अंदाज आहे. पण, यापेक्षा कमी मतदान झाल्याने त्याचा फटका कोणाला बसतो हे पाहण्यासारखे ठरेल.
बुलडाणा येथे तिरंगी लढत होत असून आहे. शिवसेना विरुद्ध शिवसेना अशीच लढत आहे. शिवसेना (शिंदे गट) प्रतापराव जाधव विरुद्ध शिवसेना (उध्दव ठाकरे ) नरेंद्र खेडेकर आणि अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर यांच्यात लढत झाली आहे. आता फक्त निकालाची उत्सुकता आहे.