NCP Politics : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण पक्षातील युवा चेहरा राष्ट्रवादीला सोडणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा हे पक्षाला सोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा दिल्लीत रंगली आहे.
धीरज शर्मा यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये राष्ट्रवादी पक्षातील सगळ्या पदांचा राजीनामा दिल्याचे त्यांनी सांगितले आहे. धीरज शर्मा यांनी जरी पक्षातील पदांचा म्हणजेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा जरी राजीनामा दिला असला तरी त्यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
धीरज शर्मा यांची फेसबुक पोस्ट काय?
”मी धीरज शर्मा, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने दिलेल्या सर्व पदांमधून स्वत:ला मुक्त करतो आहे”, अशी फेसबुक पोस्ट धीरज शर्मा यांनी लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या फेसबुक पेजला, शरद पवारांना आणि सुप्रिया सुळे यांना टॅग केले आहे.
धीरज शर्मा कोण आहे ?
धीरज शर्मा हे राष्ट्रवादीचे युवा चेहरा आहेत. तरूण वर्गाशी त्यांचा संवाद आहे. युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष राहिले आहेत. 2019 ला महाविकास आघाडी होती. दरम्यान अद्यापही धीरज शर्मा हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातून बाहेर पडले नाहीत. ते अजूनही शरद पवार यांच्यासोबतच आहेत. फक्त त्यांनी पक्षाच्या राष्ट्रीय पदाचा राजीनामा दिला. यामुळे ते आता पक्ष सोडणार असल्याच्या तर्क वितर्कांना आता उधाण आले आहे.