NCP : परळी शहरातील बँक कॉलनी परिसरात 29 जून रोजी रात्री झालेल्या गोळीबारात अजित पवार गटाचे परळी तालुक्यातील मरळवाडी गावचे युवा सरपंच बापूराव आंधळे यांचा जागीच मृत्यू झाला आहे. ज्ञानोबा गित्ते यांच्यासह एक जण गंभीर जखमी आहे. बँक कॉलनी परिसरात ही थरारक घटना घडली. गोळीबार कोणी केला याबाबत पोलिसांकडून कोणतीही ठोस माहिती मिळालेली नाही. या घटनेमागचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. या घटनेने बीड जिल्ह्यात खळबळ उडाली असून परळी पोलिस पुढील तपास करीत आहेत.
जखमी ज्ञानोबा गित्ते यांना पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अद्याप पोलिसांकडून याबाबत कोणतीही ठोस माहिती न मिळाल्याने पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून शहरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.
या गोळीबारात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट धनंजय मुंडे समर्थक मरळवाडीचे विद्यमान सरपंच बापूराव आंधळे यांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. नंदागौळ येथील ज्ञानोबा मारोती गित्ते जखमी झाले आहेत. गोळीबार नेमक्या कोणत्या कारणामुळे झाला आणि कुणी केला याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.
गोळीबारात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते बबन गिते यांचा सहकारी महादेव गीते यांनाही गोळी लागली. त्यांच्यावर अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या गोळीबार प्रकरणामध्ये एक ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात काम
गोळीबारात ठार झालेले बापू आंधळे हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात काम करीत होते. त्यासोबतच जखमी झालेले ज्ञानोबा गीते हे सुद्धा धनंजय मुंडे यांचे समर्थक आहेत. तिसरे जखमी झालेले महादेव गीते हे बबन गिते जे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आहेत
त्यांचे समर्थक आहेत. हा गोळीबार नेमका कोणत्या कारणाने झाला अथवा कोणी कुणावर गोळी झाडली हे अद्याप समजू शकले नाही. ही घटना घडल्यानंतर घटनास्थळी पोलिस पोहोचले मात्र अद्याप घटना कशामुळे घडली आणि कुणी घडवली हे उघडकीस आले नाही.