महाराष्ट्र

Rohit Pawar : महायुतीच्या उमेदवारांना पळता भुई थोडी होणार 

NCP On Mahayuti : नागपूरकरच म्हणताहेत की, विकास बंद करा

Targets Devendra Fadnavis : लोकसभा निवडणुकीत 2019 मध्ये भाजपला मिळालेले मतदान आणि 2024 मधील मतं यामध्ये खूप फरक आहे. यंदा देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातून नितीन गडकरींना कमी मते मिळाली आहेत. यावरून तेथे लोकांमध्ये नाराजी आहे, हे स्पष्ट होते. नागपुरात आता लोकच आंदोलन करायला लागले आहेत. विकास बंद करा, अशी लोकांची मागणी आहे. थोडा जरी पाऊस आला तरी लोकांना प्रचंड अडचणी सोसाव्या लागतात. त्यामुळे लोकांना अडचणीचा ठरेल असा विकास नको आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी हा दावा केला.

रोहित पवार सोमवारी (ता. 26) नागपुरात पोहोचले. त्यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. पवार म्हणाले, फडणवीस महाराष्ट्राचे नेते आहेत. पण त्यांचं शहरच जर विकासाच्या बाबतीत चुकीच्या दिशेने जात असेल तर या विकासाला काही अर्थ नाही. माजी गृहमंत्री अनिल देशमुख जर निवडणुकीत उभे राहिले तर देवेंद्र फडणवीसांना चॅलेंज देऊ शकतील. काँग्रेसचेही काही नेते फडणवीसांना चॅलेंज देऊ शकतील. महायुतीच्या नेत्यांना त्यांचा मतदारसंघही सोडता येणार नाही, अशी परिस्थिती या निवडणुकीत येणार आहे, असा दावाही आमदार पवार यांनी केला.

मोदींना पत्र

राज्यात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. बदलापूरच्या घटनेनंतर अशा अनेक घटना पुढे येऊ लागल्या आहेत. यावरून राज्यातील राजकीय वातावरणही चांगलेच तापलं आहे. महिला अत्याचाराचा मुद्द्यावरूनच राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिलं होतं. महाराष्ट्रात महिला अत्याचारांच्या घटना प्रचंड वाढल्या आहे. याकडे राज्यसरकारचे पूर्णतः दुर्लक्ष झाल्याने राज्यात महिला सुरक्षेचा प्रश्न अतिशय गंभीर बनला आहे, असं पवार पत्रात म्हणाले आहेत. गृहविभागाच्या कार्यक्षमतेबद्दल त्यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले.

महाराष्ट्रात गेल्या 10 दिवसांत 12 ठिकाणी अत्याचाराच्या घटना समोर आल्या आहेत. प्रत्येक घटनेनंतर राज्य सरकार केवळ आश्वासन देत आहे. महाराष्ट्रात शक्‍ती कायदा पारित झाला होता, परंतु केंद्र सरकारने तांत्रिक कारणे देत हा कायदा रोखून धरला आहे. या कायद्याला ‘शक्‍ती’ असे नाव न देता नंबर द्यावा, हा केंद्र सरकारचा पहिला आक्षेप आहे. संपूर्ण देशभरात शक्‍ती कायदा अंमलात आणण्याची आवश्यकता आहे, असेही पवार यांचे म्हणणे आहे.

महाराष्ट्र सरकार महिला सुरक्षेच्या प्रश्नासंबंधी अत्यंत असंवेदनशीलता दाखवत आहे. त्यामुळे आपण महाराष्ट्र सरकारला समज देणे गरजेचे आहे.राज्याचा गृहविभाग पूर्णता अपयशी ठरला असून गृहविभागाची धुरा कार्यक्षम व्यक्‍तीच्या हातात देणे गरजेचे आहे, असेही आमदार रोहित पवार यांनी नमूद केले होते.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!