New Dispute : भंडारा जिल्हाच्या मोहाडी-तुमसर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार राजू कारेमोरे यांचा पुन्हा एक ऑडिओ सध्या जिल्ह्यात व्हायरल झाला आहे. महिला शासकीय अधिकाऱ्याला समज देताना त्यांची ऑडिओ क्लिप प्रचंड व्हायरल झाली आहे. आता आमदाराने थेट फोन लावल्याने या क्लिपचे महाभारत जिल्ह्यात सुरू झाले आहे.
शनिवारी (28 सप्टेंबर) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसची जनसन्मान यात्रा तुमसरात पोहोचली. स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार कार्यक्रमाला येणार म्हणून दोन दिवसापासून आयोजनाला सुरुवात करण्यात आली होती. सहाजिकच नेत्याला खुश करण्याचा प्रयत्न आयोजक म्हणून आमदार राजू कारेमोरे यांचा होता. सभास्थळी कोणतीही समस्या निर्माण होऊ नये, कार्यक्रम व्यवस्थित पार पडावा अशी कारेमोरे यांची अपेक्षा होती. आयोजनात कार्यकर्त्यांची फौजही कारेमोरेंनी लावली होती. कार्यक्रम व्यवस्थित पार पडला, असे वाटत नाही, तोच आमदार कारेमोरेंचा ऑडिओ व्हायरल झाला.
पुन्हा वाद
क्लिपमध्ये नगर परिषदेच्या महिला मुख्याधिकाऱ्याना खडे बोल सुनावताना आमदार राजू कारेमोरे यांचा आवाज ऐकू येतो. लाडक्या बहिणीला पैशाचा मोह आणि महिला अधिकाऱ्यांना दमदाटी, असे आयते कोलित आमदारांनी विरोधकांना दिले आहे. याबाबत ‘द लोकहित’ने थेट आमदार राजू कारेमोरे यांच्याशी फोनवरून संपर्क साधला. त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली. आमदार कारेमोरे म्हणाले, उपमुख्यमंत्री तुमसरात आले होते. त्यामुळे आपण नगरपरिषद अधिकाऱ्याना सभास्थळी येत असलेल्या अडचणींबाबत माहिती दिली. मात्र काम न झाल्याने आपण त्यांना लोकप्रतिनिधी या नात्याने जाब विचारला. संवाद सुरू असताना आमदार कारेमोर मुंबईकडे प्रवासात असल्याचे अधिक बोलणे होऊ शकले नाही.
कार्यकर्तेच आमदार राजू कारेमोरेंची अडचण वाढवत असल्याचे दिसून येत आहे. आजवर आमदार कारेमोरे यांचे पोलिस अथवा शासकीय अधिकाऱ्यांसोबत अनेकदा वाद झालेत. शासकीय नर्सेसनेही कारेमोर यांच्यामुळे आंदोलन केले होते. याला कार्यकर्तेच कारणीभूत ठरत आहेत. कार्यक्रमाची जबाबदारी कार्यकर्त्यांना दिली असतानाही गोंधळ उडाला. त्यामुळे आमदार कारेमोर यांनी कार्यकर्त्यांनाही समज देण्याची गरज आहे.
लॉटरी लागली?
अजित पवार गटाकडून विदर्भातील कोणत्याही जागेबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. केवळ मोहाडी-तुमसर विधानसभा मतदारसंघासाठी अजित पवारांनी घोषणा केली आहे. त्यातही निवडणुकीचे तिकीट आमदार राजू कारेमोरे यांना देऊन टाकले आहे. मोरगाव अर्जुनीचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे देखील यावेळी व्यासपीठावर होते. त्यांच्या संदर्भात पवार काहीच बोलले नाही. कारेमोरे यांचे तिकीट मात्र फायनल झाल्याचे घोषित झाले आहे. त्यामुळे आता राजू कारेमोरे अधिकृतपणे मैदानात असल्याचे स्पष्ट झाले आहे. तिकिट मिळविण्याचा टप्पा कारेमोरे यांनी जिंकला आहे. आता खरे युद्ध बाकी आहे. अशात राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी राज्यभरा फिरत असताना आमदार कारेमोरांनी थेट फोनवर महिला अधिकाऱ्याला सुनावलेआहे. त्यामुळे त्यांचे हे वागणे मतदारांना कितपत रूचणार हे पाहण्या सारखे ठरणार आहे.