महाराष्ट्र

Ajit Pawar : अजित पवारांचे 5 आमदार घरवापसी करणार ?

Jayant Patil : जयंत पाटील यांच्या फोनचा वापर वाढला

Maharashtra Politics : लोकसभा निवडणुकीनंतर गुरुवारी अजित पवार यांच्या नेतृत्वात मुंबईतील ट्रायडन्ट हॉटेलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) आमदारांची बैठक झाली. पराभव झाला तरी चालेल, पण अजित पवार यांची साथ सोडणार नाही, असा निर्धार या बैठकीत आमदारांनी एकमताने केल्याची माहिती मिळाली आहे. 

कुठलाही आमदार शरद पवार यांच्या पक्षातील आमदारांच्या संपर्कात नसल्याची ग्वाहीदेखील बैठकीला उपस्थित असणाऱ्यांनी दिल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र या बैठकीत राज्यातील 5 आमदार अनुपस्थित होते. यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा मतदारसंघातील डॉ.राजेंद्र शिंगणे यांचा समावेश आहे. जिल्ह्यामध्ये आता शिंगणेंची घरवापसी होत असल्याची चर्चा रंगू लागली आहे.

अजित पवार बॅकफूटवर 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक शरद पवार यांनीच स्थापन केलेला पक्ष फोडून, त्यांच्याच विरोधात बंड पुकारणारे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आता चांगलेच बॅकफूटवर गेले आहेत. या निवडणुकीत शरद पवारांनी 10 पैकी 8 खासदार निवडून आणले. तर दुसरीकडे अजित पवार हे त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवारांनाही निवडून आणू शकले नाहीत. त्यांचा राज्यात एकच खासदार निवडून आला. त्यामुळे अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांमध्ये आता चलबिचल सुरू असल्याची माहिती आहे.

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात सुरू झालेल्या चलबिचलीच्या पार्श्वभूमीवर पक्षाने काल (ता. 6) आमदारांची बैठक बोलावली होती. पक्षाचे काही आमदार शरद पवार गटात परतण्याची चर्चा सुरू झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर या बैठकीला किती आमदार हजेरी लावतात, याची उत्सुकता होती. या बैठकीला पाच आमदारांनी विविध कारणे सांगून दांडी मारली असल्याची बाब उघडकीस आली.

सिंदखेड राजा मतदार संघातील डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्यासह धर्मराव बाबा आत्राम, नरहरी झिरवळ, सुनील टिंगरे, आण्णा बनसोडे यांचा समावेश असल्याची माहिती आहे. लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारूण पराभवानंतर आणि जनतेचा भाजपसहित त्यांच्या मित्रपक्षांवर असेलला रोष पाहता, तसेच जनतेच्या न्यायालयात ‘खरी राष्ट्रवादी’ ही शरद पवार यांचीच असल्याचे सिद्ध झाले आहे.

अजित पवारांच्या आमदारांमध्ये कमालीची अस्वस्थता पहावयास मिळत आहे. निवडणुकीनंतर अजित पवारांनी त्यांच्या गटाच्या मंत्र्यांची ‘देवगिरी’ या आपल्या शासकीय नावासस्थानी बैठक घेतली. त्यानंतर सर्व आमदारांची मुंबईतील ट्रायडेंट हॉटेलमध्ये बैठक पार पडली. या बैठकीला धर्मराव बाबा आत्राम, नरहरी झिरवळ, सुनील टिंगरे, आण्णा बनसोडे आणि राजेंद्र शिंगणे या आमदारांची अनुपस्थिती होती.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या पत्रकार परिषदेमध्ये जेव्हा, आमदार तुमच्या संपर्कात आहेत का, असा प्रश्न पत्रकारांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना केला. यावर जयंत पाटील यांनी एका वाक्यात उत्तर दिले. सध्या माझ्या मोबाईलचा वापर वाढला आहे, एवढंच सांगतो, असे सूचक विधान पाटलांनी केले. त्यामुळे अजित पवार गटातील काही आमदार घरवापसीच्या तयारीत असल्याची चर्चा मुंबईतच नाही तर विदर्भातही रंगली आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!