Maharashtra Politics : काँग्रेसच्या कार्यकर्त्याने प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांचे पाय धुतल्याचा मुद्दा आता चांगलाच तापला आहे. नाना पटोले यांच्यावर यासंदर्भात अनेक स्तरातून टीका होत आहे. महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा विजय मिळाला. त्यामुळे काँग्रेसचा जोश वाढला आहे. अशात नाना पटोले अकोल्यात आल्यानंतर एका कार्यकर्त्याने त्यांचे पाय धुतले. यासंदर्भात महायुतीमधील घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसने पटोले यांच्यावर टीका केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आमदार अमोल मिटकरी यांनी नाना पटोले यांच्यासंदर्भात संताप व्यक्त केला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी स्वतःला संत समजू नये. पक्षाचे कार्यकर्ते तुमचे नोकर नाहीत, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी बोचरी टीका केली आहे. निवडणुकीत विजयानंतर सध्या सर्वत्र नाना पटोले यांचाच उदोउदो सुरू आहे. नाना पटोले यांचे चिखलाने माखलेले पाय चक्क कार्यकर्त्याने पाण्याने धुतले. हा प्रकार चुकीचा असल्याचे आमदार मिटकरी म्हणाले. वाडेगाव येथील हा प्रकार आहे.
पालखीतील चिखल
संत श्री गजानन महाराजांची पालखी वाडेगाव येथे मुक्कामी होती. नानासाहेब चिंचोळकर विद्यालयाच्या मैदानावर पावसामुळे मोठा चिखल झाला होता. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी चिखलातून मार्ग काढला. त्यानंतर संत श्री. गजानन महाराजांच्या पालखीचे दर्शन घेतले. मैदानावरील चिखलामुळे नाना पटोले यांचे पाय मातीने माखले. नागपूरकडे रवाना होण्यासाठी तातडीने त्यांच्या वाहनाकडे गेले. मात्र पायाला मातीत असल्याने ते त्यांच्या ‘एसी’ वाहनात बसू शकले नाहीत. पाय मातीने माखलेले असल्याने त्यांनी पाय धुण्यासाठी पाणी बोलावले. वाहनाजवळ पटोले यांचे चिखलाने माखलेले पाय एका कार्यकर्त्याने धुतले.
विजय गुरव हे पाय धुणाऱ्या कार्यकर्त्याचे नाव बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील ते रहिवासी आहेत. या प्रकारानंतर पटोले यांच्याविरुद्ध टीकेची झोड उठली आहे. याबाबत आमदार अमोल मिटकरी म्हणाले, कदाचित पालखी सोहळ्याच्या निमित्ताने हा पहिल्यांदाच प्रकार पाहायला मिळाला. नेते अशा प्रकारे कार्यकर्त्यांना वापरून पाय धुवायला लावत असतील तर निंदाजनक गोष्ट आहे. पक्षाचे धोरण काय हे दिसून येते. हा प्रकार चीड आणणारा आहे. नेत्यांनी कार्यकर्त्यांकडून पाय धुवून घेणे, हा कार्यकर्त्यांचा अपमान आहे. पटोले यांनी स्वतःला संत आणि कार्यकर्त्याला नोकर समजू नये.
मध्य प्रदेशही होते चर्चेत
काही वर्षांपूर्वी मध्य प्रदेशातील असाच एक प्रकार चर्चेत आला होता. त्यावेळी शिवराजसिंह चव्हाण दौऱ्यावर होते. वाटेत चिखल होता. त्यामुळे सुरक्षा रक्षकांनी त्यांना हाताने उचलून नेले होते. शिवराज सिंह चव्हाण यांनी त्यावेळी बुटापासून सुटापर्यंत सर्वच पांढरे कपडे परिधान केले होते. त्यानंतर चव्हाण यांच्या विरोधात प्रचंड टीका झाली. असाच प्रकार आता नाना पटोले यांच्याबाबत घडला आहे. फरक तो एवढाच आहे की, चव्हाण यांना कडेवर उचलून नेले होते आणि पटोले यांनी पाय धुवून घेतले आहेत.
काँग्रेसचे मौन
नाना पटोले यांच्या या कृतीसंदर्भात सध्या काँग्रेसने मौन बाळगले आहे. अद्याप कोणतीही प्रतिक्रिया काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याने व्यक्त केलेली नाही. नाना पटोलेही यासंदर्भात मोकळेपणाने बोलेले नाहीत. भाजपकडून पाय धुतल्याच्या या मुद्द्यावरून नानांवर चिखलफेक होणार हे निश्चित आहे.