Mahayuti Government : गोंदिया जिल्ह्याला पालकमंत्र्याच्या नावावर ‘झेंडा मंत्री’ मिळतात या वाक्याला बळ देणारे पालकमंत्री पाच वर्षात मिळाले आहेत. या झेंडा मंत्र्यांपेक्षाही मोठा रेकॉर्ड गोंदियाचे पालकमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी नोंदविला आहे. अतिवृष्टी, पुरामुळे अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. अशा दु:खद प्रसंगातही पालकमंत्री आत्राम यांनी जिल्ह्याकडे पाठ फिरवली आहे. तब्बल तीन महिन्यांपासून पालकमंत्र्यांनी जिल्ह्यात पाय ठेवलेला नाही. जिल्ह्यात काय सुरू आहे, याची देखील त्यांना खबर नाही.
गोंदिया जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून अतिवृष्टीमुळे मोठे संकट ओढावले आहे. सर्वत्र मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नागरिकांमध्ये हाहा:कार आहे. प्रशासन काम करीत आहे. पण एकाही मंत्र्याने त्याची दखल घेतलेली नाही. राज्यातील अनेक भागात पाऊस आणि पुरामुळे तडाखा बसला. त्यानंतर राजकीय मंडळी नुकसानग्रस्त क्षेत्राची पाहणी करीत आहेत. शेतकरी व सामान्यांची व्यथा जाणून घेत आहेत. मात्र एकही राजकीय नेता गोंदियात फिरकलेला नाही. संपूर्ण जिल्ह्याचा कारभार सध्या रामभरोसे आहे. अन्य आमदारही मौन आहेत.
शोध कोण घेणार?
गेल्या तीन महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या पालकमंत्र्यांचा शोध कोण घेणार असा प्रश्न आहे. सर्वसामान्य नागरिकांनाच आता हा शोध घ्यावा लागणार आहे. सत्ताधारी व विरोधकही आत्राम बेपत्ता असल्याबाबत मौन आहेत. कोणीही यावर प्रश्न उपस्थित करताना दिसत नाही. गोंदिया राज्याच्या टोकावरचा जिल्हा आहे. असे असले तरी राजकीय दृष्टीकोनातून जिल्ह्याची ओळख मोठी आहे. राज्य व देशाच्या पटलावर गोंदियाला महत्व आहे. गोंदियात अनेक हेवीवेट नेते आहेत. परंतु काहींच्या नाकर्तेपणामुळे हा जिल्हा पालक असूनही पोरका झाला आहे.
अतिशयोक्ती वाटत असली तरी हेच कटु सत्य आहे. गोंदियाकर याचा प्रत्यक्ष अनुभव घेत आहेत. गोंदिया जिल्ह्याच्या निर्मितीपासून महादेव शिवणकर, राजकुमार बडोले हे दोनच पालकमंत्री स्थानिक मिळाले. उर्वरित सर्व पालकमंत्री इम्पोर्टेडच होते. दुसऱ्या जिल्ह्यातील मंत्र्याच्या खांद्यावरच पालकत्वाची जबाबदारी देण्यात आली. परिणामी दुसऱ्या जिल्ह्यातील मंत्री बैठक, राष्ट्रीय उत्सावंचे दिवस सोडले तर जिल्ह्यातून गायब असतात. त्यामुळे गोंदिया जिल्ह्याला केवळ झेंडा टू झेंडा दिसणारे पालकमंत्रीच मिळतात. गेल्या पाच वर्षात लाभलेल्या पाचही पालकमंत्र्यांनी हाच कित्ता गिरविला.
पाच वर्षात पाच पालकमंत्री मिळाल्याने गोंदियातील अनेक समस्या सुटलेल्या नाहीत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात अनिल देशमुख पालकमंत्री होते. ते कारागृहात गेल्यानंतर जिल्ह्याचे पालकत्व नवाब मलिक यांना देण्यात आले. देशमुख यांच्या पाठोपाठ ते देखील कारागृहात गेले. त्यामुळे त्यांच्याकडील कारभार प्राजक्त तनपुरे यांना मिळाला. तनपुरे फारच क्वचित गोंदियात आले. त्यानंतर राज्यात महाविकास आघाडी सरकारचे पतन झाले. महायुतीचे सरकार आल्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे पालकत्व आले. मुनगंटीवार सोडता या उर्वरित तीनही मंत्र्यांनी पालकमंत्रिपदाच्या जबाबदारीत रस दाखवला नाही. मुनगंटीवार यांनीच काय ते वेगाने काम केले.
मुगंटीवार यांच्याकडून सरकारने गोंदियाची जबाबदारी काढली. त्यानंतर गडचिरोलीचे धर्मरावबाबा आत्राम यांना गोंदियाचे पालकमंत्री करण्यात आले. मात्र आत्राम हे गेल्या तीन महिन्यांपासून जिल्ह्यातून बेपत्ता आहेत. अनेकदा आत्राम नागपुरात येतात. नागपूरमार्गे गडचिरोलीला जातात. गडचिरोलीत अनेक दिवस मुक्कामी असतात. परंतु गोंदियाकडे पाहायला किंवा गोंदियात यायला त्यांच्याजवळ वेळच नाही. अशी कोणती ‘घड्याळ’ त्यांना दिली जावी, ज्यात वेळ पाहून ते गोंदियात येतील, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.