Assembly Election : धर्माचा वापर करीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस राजकारण करीत आहे. हा प्रकार अत्यंत खेदजनक आहे. खरं तर शरद पवार हे जिहादचे सिपहसालार असल्याची गंभीर टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. शनिवारी (16 नोव्हेंबर) फडणवीस यांनी नागपुरात प्रसार माध्यमांशी संवाद साधला. महाविकास आघाडीमधील तीनही पक्ष चुकीच्या ट्रॅकवर आहेत. काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे ‘व्होट जिहाद’ करीत असल्याची टीकाही फडणवीस यांनी केली.
उलेमा कौन्सिलच्या प्रमुखांनी काही मागण्या केल्या आहेत. या मागण्या अत्यंत गंभीर आहेत. एकूण 17 मागण्या करण्यात आल्या आहेत. मुस्लिम समाजाला दहा टक्के आरक्षण मागण्यात आलं आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात अनेक दंगली घडल्या. 2024 पर्यंत ज्या दंगली घडल्या त्यातील आरोपींना दोषमुक्त करण्याची मागणी यात आहे. विशेषत: मुस्लिम समाजातील आरोपींना सोडण्याची मागणी उलेमांकडून करण्यात आली आहे, असं फडणवीस म्हणाले.
संघावर बंदीची मागणी
राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही बंदी घालण्याची मागणी उलेमांकडून करण्यात आली आहे. ही मागणी सुद्धा अत्यंत भयानक आहे. महाविकास आघाडीमधील तीनही पक्षांनी उलेमा संघटनेला पत्र दिलं आहे. या मागण्या मान्य करण्यात येतील, असं त्या पत्रात नमूद आहे. महाविकास आघाडीनं ठामपणे लिहून दिल्यानंतर सज्जाद नोमानी लोकांना महाविकास आघाडीच्या पाठिशी उभं राहण्याबाबत अपिल करीत असल्याचंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
नोमानी यांनी ‘व्होट जिहाद’ची हाक दिली आहे. या जिहादचे सिपहसालार शरद पवार असल्याचंही ते सांगत आहेत. यावरून महाविकास आघाडीला देशात काय घडवायचं आहे, याचा अंदाज येतो, असं फडणवीस म्हणाले. उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांचं नावही नोमानी घेत आहेत. राहुल गांधी यांना तर ते आदर्शच मानत आहेत. निवडणुकीच्या काळात इतकी जातीयता अयोग्य असल्याचंही देवेंद्र फडणवीस म्हणाले. देशाच्या इतिहासात हे प्रथमच होत असल्याचं ते म्हणाले.
एकजुटीची हाक
देशात धर्माच्या नावावर काँग्रेस राजकारण करीत आहे. त्यामुळे देशाची अधोगती थांबविण्यासाठी सर्वांना एक व्हावंच लागेल, असं आवाहनही देवेंद्र फडणवीस यांनी केलं. बहुसंख्य मतं असलेल्या समाजानं विचार करायला हवा. भाजपला मतदान करणाऱ्या मुस्लिम लोकांचं अन्नपाणी बंद करण्याचं आवाहन नोमानी करीत आहेत. त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्याचा दावाही फडणवीस यांनी केला. असं आवाहन होत असताना की कोणती धर्मनिरपेक्षता आहे, असा प्रश्नही फडणवीस यांनी केला.