Assembly Election : दिलीप वळसे पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही नेत्यांकडून विरोध होता. त्यांना पद मिळणार नव्हतं. त्यावेळी दिलीप वळसे पाटील आणि त्यांचे कुटुंबीय पवारांच्या भेटीसाठी आले होते. पवारांशी चर्चा झाल्यानंतर वळसे पाटलांना पद मिळालं. मात्र काम निघाल्यानंतर दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवार यांच्याशी धोका केला. दिलीप वळसे पाटील यांनी स्वार्थासाठी भाजपचा साथ धरला. हा प्रकार अत्यंत चुकीचा असल्याची टीका, आमदार रोहित पवार यांनी केली.
नागपुरात गुरुवारी (14 नोव्हेंबर) आमदार पवारांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. शरद पवार यांनी प्रेमानं आणि आपुलकीनं दिलीप वळसे पाटील यांना जवळ केलं. मात्र ज्यावेळी पवारांना दिलीप वळसे पाटील यांची गरज होती, त्यावेळी वळसे पाटलांनी पाठ वळविल्याची टीकाही पवार यांनी केली. केवळसत्तेसाठी वळसे यांनी हे केलं. दिलीप वळसे पाटील यांच्यावर कारवाई होणार होती. या कारवाईच्या भीतीनं दिलीप वळसे हे भाजपसोबत गेल्याचा आरोपही पवारांनी केला.
मित्राचा फायदा
दिलीप वळसे पाटील भाजपसोबत गेल्यानंतर त्यांचा मोठा फायदा झाला. त्यांच्या मित्राला सरकारकडून मोठं कंत्राट देण्यात आल्याचा खळबळजनक आरोपही आमदार रोहित पवार यांनी केला. या कंत्राटातून दिलीप वळसे यांनी पैसा खाल्ल्याचा आरोपही त्यांनी केली. विकासाच्या मुद्द्यावर आपण भाजपसोबत गेल्याचं दिलीप वळसे पाटील सांगतात. हा निर्णय घेत पाटलांनी कोणता विकास साधला, असा प्रश्नही आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केला. पवारांसोबत अनेकांनी गद्दारी केली आहे. त्यांच्यासोबत गद्दारी करणाऱ्यांना ते योग्य उत्तर देतील, असंही पवार म्हणाले.
उत्तर प्रदेश आणि गुजरातची स्टाइल महाराष्ट्रातील लोकांवर लादण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे. असा प्रयत्न जर भाजपकडून करण्यात येत असेल तर जनता त्याचा प्रत्युत्तर देतील, असंही पवार म्हणाले. जातीयवाद पसरविण्यापेक्षा सरकारनं तरुणांना रोजगार द्यावा. महाराष्ट्रातील नेते गुजरातची सेवा करीत आहेत. महाराष्ट्र लुटवित गुजरातचं घर भरण्यात येत असल्याची टीकाही पवार यांनी केली.
मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांना भाजपनं सुपारी दिल्याचं दिसत आहे. काही मतं घेऊन राज ठाकरे मतांचं विभाजन करीत असल्याचंही पवार म्हणाले. राज ठाकरे हे भाजपलाच मदत करीत आहेत. कोण कोणत्या कारणांमुळं निवडणूक लढत आहे, हे जनतेला माहिती असल्याचं पवार म्हणाले. शरद पवार यांनी कोणतंही कुटुंब फोडलं नाही. पक्ष फोडणं आणि घर फोडणं यात फरक असल्याचंही आमदार रोहित पवार म्हणाले.